Tue, Mar 19, 2019 21:01होमपेज › Marathwada › शेतकर्‍यांच्या मालाला हमीभावच मिळेना!

शेतकर्‍यांच्या मालाला हमीभावच मिळेना!

Published On: Mar 16 2018 1:22AM | Last Updated: Mar 16 2018 1:22AMबीड : दिनेश गुळवे

बोंडअळीच्या हल्ल्यातून वाचलेला कापूस आता कमी भावाच्या मार्‍यात सापडला आहे. एकीकडे कापूस वेचणीसाठी वीस रुपये किलोचा दर मजुरांना द्यावा लागत आहे, तर दुसरीकडे कापूस विक्रीचा दर 30 ते 33 रुपये प्रतिकिलो झाला आहे. यामुळे शेतकर्‍यांना शेतीवर झालेला खर्चही निघत नसल्याने, चार आण्याची कोंबडी अन् बारा आण्याचा मसाला अशी शेतीची अवस्था झाली आहे. 

यंदा बीड जिल्ह्यात चार लाख हेक्टर क्षेत्रावर कापूस लागवड झाली आहे. कापूस लागवड, मशागत, खत- फवारणी यावर शेतकर्‍यांनी मोठा खर्च केला आहे. कपाशीला टपोरे बोंड येताच बोंडअळीने हल्ला केला. महागडी औषध फवारणी करूनही कपाशीवरील प्रादुर्भाव कमी झाला नाही. यामुळे कपाशीचे उत्पादन 50 टक्के घटल्याचा  शासकीय अंदाज असला तरी प्रत्यक्षात मात्र शेतकर्‍यांचे उत्पादन 70ते 80 टक्के घटले आहे. यामुळे शेतकर्‍याचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. 

बोंडअळीच्या हल्ल्यानंतर काही कापूस आला आहे. हा कापूस वेचणीसाठी मजुरांना प्रति किलोसाठी 20 रुपयांचा दर आहे, तर हाच कापूस विक्रीसाठी 30 ते 33 रुपये किलोचा दर आहे. यामुळे शेतकर्‍यांना कापूस वेचणी करणेही कठीण जात आहे.

कापसाला हमीभाव चार हजार 140 ते चार हजार 200 पर्यंत आहे. असा भाव असतानाच शेतीपिकांना दीडपट हमी भाव देण्याचे सांगितले जात आहे. वास्तविक मात्र शेतीपिकांना हमीभाव मिळत नसल्याने, त्यांची दिवसाढवळ्या प्रचंड आथिर्र्क लूट होत आहे. परंतू शासकीय यंत्रणा मात्र मूग गिळून गप्प असल्याचे दिसून येते. याचा गैरफायदा गावोगाव तयार झालेले दलाल, व्यापारी व जिनिंग मालक घेत आहेत. यांची साखळी तयार झाली असून शेतकर्‍यांची संगनमत करून लूट होत आहे. यात शेतकरी भरडला जात आहे.

कापूस वेचल्याने बोटांना इजा
कापूस वेचणी सध्या कठीण जात आहे. नखाट्या बोटांना लागत असल्याने बोटांतून रक्त येते. यासह कापसावर वारंवार झालेल्या फवारण्यांनी कापूस अंगास लागताच खाज येेते. कापूस वेचलाही जात नाही. यामुळे कापूस वेचणीचे दर वाढले आहेत.
    - रामेश्‍वर गाढे, शेतकरी, गेवराई.

कापूस खरेदीसाठी दिले पत्र : बागल
कापसाला हमीभावापेक्षा अधिक दर खुल्या बाजारात असल्याने शासकीय खरेदी केंद्र (सीसीआय) बंद करण्यात आले आहे. हमीभावापेक्षा कमी दराने कापूस खरेदी करू नका, यासाठी संबंधितांना पत्र दिले आहे. 
    - बी. एम. बागल,     सचिव, कृउबा गेवराई.