होमपेज › Marathwada › जिल्ह्यातील द्राक्षांना 60 रुपये किलोचा दर

जिल्ह्यातील द्राक्षांना 60 रुपये किलोचा दर

Published On: Feb 07 2018 1:34AM | Last Updated: Feb 07 2018 12:49AMजालना : प्रतिनिधी

येथील बाजारपेठेमध्ये स्थानिक शेतकर्‍यांच्या बागांतील द्राक्ष विक्रीसाठी येण्यास सुरुवात झाली आहे. पहिल्याच टप्प्यात किलोला 50 ते 60 रुपये किलोचा दर मिळत आहे. अन्य ठिकाणचे द्राक्ष येथे विक्रीसाठी आल्यानंतर दरात घट होणार असल्याचा अंदाज  व्यापार्‍यांनी वर्तविला आहे.

सफरचंद, चिकूसह अन्य फळांच्या दरात आता किंचितशी वाढ झाली आहे. येथील द्राक्ष उत्पादक प्रामुख्याने फेब्रुवारीच्या अंतिम आठवड्यापासून विक्रीसाठी आणतात, मात्र यावर्षी काहीसे लवकरच द्राक्ष बाजारात विक्रीसाठी आणण्यात आले आहेत. सध्या मिनी नाशिक म्हणून ओळखले जाणार्‍या कडवंची, नंदापूर, पीरकल्याण, नाव्हा, वरूड यांसह शहरलगत आदी ठिकाणच्या बागांमधील द्राक्ष बाजारात उपलब्ध झाले आहेत. पहिलाच टप्पा असल्यामुळे ग्राहकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. सध्या क्रमांक एकचा माल 60 तर त्याखालील दर्जाचा माल 40 ते 50 रुपयांमध्ये विकला जात आहे. 
पहिलाच बहर असल्याने द्राक्षांना काहीसा आंबटपणा आहे. तरीही शहरातील बाजारपेठेत द्राक्षांना चांगली मागणी आहे. सध्या स्थानिक शेतकर्‍यांची आवक असल्यामुळे दरात स्थिरता आहे. अनेक विक्रेत्यांनी अद्यापही बाहेरील द्राक्ष विक्रीसाठी आणलेले नाहीत. यामुळे दर अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे. बाहेरील माल वाढल्यानंतर दरात मोठी घट होणार आहे. तोपर्यंत याच दरात द्राक्षांचा आस्वाद घ्यावा लागणार आहे. शहरातील सिंधी बाजारातील फळ मार्केटसह, गाधी चमन, नूतन वसाहत, शिवाजी पुतळा येथे द्राक्षे उपलब्ध आहे, परंतु बरेच शेतकरी स्वतः द्राक्षे विक्री करीत आहे. सिंदखेडराजा रस्त्यावर कडवंची तसेच अंबड रस्त्यावर गोलापांगरी येथे स्वतः शेतकरी द्राक्षे विक्री करीत आहे.