Sun, Aug 18, 2019 14:23होमपेज › Marathwada › तीन अपत्यामुळे ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द

तीन अपत्यामुळे ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द

Published On: Apr 18 2018 7:27PM | Last Updated: Apr 18 2018 7:27PMवैरागः प्रतिनिधी 

तडवळे (ता. बार्शी ) येथील ग्रामपंचायत निवडणुकीवेळी अपत्यांबाबतचे खोटे प्रतिज्ञापत्र दाखल करून महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कायद्याची पायमल्ली केल्याची तक्रार मेजर संजय आवारे यांनी केली होती. त्यानुसार रिता रामकृष्ण लोखंडे यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार रद्द करण्यात आले आहे. 

हा निकाल तडवळे ग्रामपंचायतीबाबतचा असला तरी अनेक गावांमध्ये अशा तक्रारी असल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

याबाबतची अधिक माहीती अशी, २०१५- १६मध्ये पार पडलेल्या तडवळे ग्रामपंचायत निवडणुकीवेळी प्रभाग क्रमांक एक मधून रिता रामकृष्ण लोखंडे यांनी निवडणूक लढवली होती. यामध्ये त्या विजयीही झाल्या. दरम्यान त्यांनी निवडणूक लढवण्यापूर्वी सादर केलेल्या नामनिर्देशन पत्रात घोषित केलेली माहीती खोटी देऊन निवडून आल्याची तक्रार संजय आवारे यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसह तहसिलदार, जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. 

यामध्ये त्यांनी रिता लोखंडे यांना दोन नव्हे तर तीन अपत्य असून ही माहीती लपवण्यात आल्याचे म्हटले आहे. याबाबतचे पुरावे ही त्यांनी तक्रारी सोबत देऊ केले आहेत.१२ सप्टेंबर २००१ नंतर एकूण मुलांच्या संख्येत भर पडून ती दोनपेक्षा अधिक झाल्यास सदस्य पद रद्द केले जाऊ शकते, या धर्तीवर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८चे कलम १४ ( १ ) चे पोट कलम ( ज-१ ) अन्वये सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाने रिता रामकृष्ण लोखंडे यांचे सदस्यत्व रद्द ठरवले.

तडवळे गावासह तालुक्याच्या राजकरणातील बडे प्रस्थ म्हणून लोखंडे यांची ओळख आहे. ह्या निकालामुळे त्यांना राजकीय वाटचालीमध्ये फटका बसण्याची शक्यता आहे. यापूर्वी रिता लोखंडे यांनी पंचायत समितीचे सदस्यत्व, कृषि उत्पन्न बाजार समितीचे सदस्यत्व, संजय गांधी निराधार योजनेच्या तालुका अध्यक्षा अशी पदे उपभोगली आहेत. 

यापूर्वी लाभाची पदे स्विकारुन अनेकांची फसवणूक झाली असण्याची शक्यता आहे. ती फसवणूक बाहेर काढून गुन्हा दाखल होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही... मेजर संजय आवारे, तक्रारदार

याबाबत आम्ही कायदेशीर लढाई लढणार असून विभागीय आयुक्तांकडे अपिल करणार आहोत.... रामकृष्ण लोखंडे