Fri, Jan 18, 2019 21:55होमपेज › Marathwada › लातुरच्या सरकारी रुग्णालयात बाळंतिणीची आत्महत्या

लातुरच्या सरकारी रुग्णालयात बाळंतिणीची आत्महत्या

Published On: Jun 04 2018 9:23PM | Last Updated: Jun 04 2018 9:23PMप्रतिनिधी: लातूर

लातूर येथील शासकीय रुग्णालयात बाळांत झालेल्या महिलेने रुग्णालयातील स्‍नानगृहात सोमवारी सायंकाळी चार वाजता गळफास घेऊन आत्महत्या केली. राधिका सहदेव चव्हाण ( वय २०) असे तिचे नाव असून आर्थिक परिस्थीतीला कंठाळून तिने हे पाऊल उचलल्याची चर्चा आहे.

या घटनेने शहरात  खळबळ उडाली आहे. औसा तालुक्यातील बुधोडा येथील राधिका या बाळंतपणासाठी औसा ग्रामीण रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. यावेळी त्यांची प्रकृती नाजूक असल्याने तसेच त्यांच्या शरीरात रक्ताचे प्रमाण कमी असल्याने त्यांना लातूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. २७ मे रोजी त्यांचे सिझर झाले होते व त्यांना मुलगा झाला होता. मुलाला कावीळ असल्याने त्याच्यावर उपचार सुरू होते. उपचारासाठी लागणारी औषधे विकत आणावी लागत होती. घरची परिस्थीती हालाखीची असल्याने पैशाची अडचण येत होती. या कारणामुळे त्या निराश झाल्या होत्या.  सोमवारी सायंकाळी चार वाजता राधिकाचे पती सहदेव तिला भेटण्यासाठी आले होते. तिला भेटून ते बाहेर गेल्‍यानंतर राधिकाने बाथरूममध्ये साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्‍महत्या केली.

दरम्यान डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे व त्यांनी बाहेरुन औषधे मागवायास लावल्यामुळे राधिकाला ताण आला होता. तणावात तीने आत्महत्या केल्याचा आरोप  करीत संबधीत डॉक्टारांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी राधिकाच्या पतीने केली आहे.  यासाठी सोमवारी रात्री ८ वाजता मोठा जमाव गांधी चौक पोलिस ठाण्यात  जमा झाला होता.