Wed, Apr 24, 2019 07:34होमपेज › Marathwada › गोपीनाथराव मुंडे कृपावंताचे जीवन जगले

गोपीनाथराव मुंडे कृपावंताचे जीवन जगले

Published On: Jun 05 2018 1:17AM | Last Updated: Jun 04 2018 11:31PMपरळी ः प्रतिनिधी

साधुसंताप्रमाणे जीवनाची लक्षणे ही केवळ लोकोत्तर व्यक्तिमत्वात पहायला मिळतात. ही लक्षणे तंतोतंत दिवंगत गोपीनाथराव मुंडे यांच्या जीवनचरित्रात लागू पडतात. जनसामान्यांच्या सुख दुःखात समरस होऊन निरपेक्ष भावनेतून सदैव साधुसंताप्रमाणे कृपावंताचे जीवन ते जगले असे प्रतिपादन महाराष्ट्रातील ख्यातकीर्त रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांनी केले. 

लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या चौथ्या स्मृतीदिनानिमित्त आज 3 जून रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘सामाजिक उत्थान दिन’ समारंभ पार पडला. तत्पूर्वी सकाळी दहा ते बारा रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांचे सुश्राव्य कीर्तन झाले. या कीर्तन प्रसंगी संत सेना महाराज यांच्या  उदार तुम्ही संत, माय बाप कृपावंत। केवढा केला उपकार, काय वाणू मी पामर ॥ या अभंगावर विवेचन करताना त्यांनी संतलक्षणे व कृपावंताचे भावदर्शन श्रोत्यांसमोर विषद केले. 

यावेळी कीर्तनातील अभंगावर विषय विवेचन करताना त्यांनी पुढे सांगितले की, या जगामध्ये कृपावंत व कृपापात्र या दोन्हींचा विचार करताना कृपावंत होणे हे कठीण असते. कृपावंत होण्यासाठी कृपा करण्याची क्षमता, अभिरुची, पात्र-अपात्र भेद विरून गेलेला, निरपेक्ष भाव, श्रेय अनासक्ती आदी गुणविशेषता अंगी बाणलेली असावी लागते. तेव्हाच कृपावंत अशी ख्याती होते. सर्वात श्रेष्ठ कृपावंत हे माय-बाप असतात. त्याहीपेक्षा कृपावंत हे साधुसंत असतात. कारण त्यांच्याकडे आप-पर भाव नसतो. संत कृपेचे फळ हे सर्वोच्च पातळीवर मानवी जीवनाचे कल्याण करणारे असते. प्रसंगी शत्रूभाव घेऊन आलेल्या व्यक्तीशी ही संत कृपावंतच होतात. त्यामुळे ज्यांच्या भाग्यात असे कृपावंत लाभतात त्यांचे जीवन कृतार्थ होते असे प्रतिपादन ढोक महाराज यांनी केले.