Wed, Mar 20, 2019 08:31होमपेज › Marathwada › गोल्डन रूट नावालाच; दोन तास बस नाही

गोल्डन रूट नावालाच; दोन तास बस नाही

Published On: May 04 2018 1:52AM | Last Updated: May 04 2018 12:57AMपरभणी :प्रतिनिधी

जिंतूर-परभणी हा राज्य परिवहन महामंडळाने गोल्डन रुट म्हणून जाहीर केलेला आहे. परंतु या मार्गावर मागील काही दिवसांपासून प्रवाशांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. मंगळवार व बुधवार रात्रीला सलग दोन दिवस तब्बल दोन तास बस परभणी स्थानकावर आली नाही. ऐन लग्नसराईत प्रवाशांना या होणार्‍या गैरसोयींकडे तोडगा काढण्यासाठी विभाग नियंत्रकांनी कठोर भूमिका घेण्याची मागणी होत आहे.

परभणी हे जिल्ह्याचे ठिकाण आहे. येथील बसस्थानकावरून परिवहन महामंडळाने जाहीर केलेल्या परभणी ते जिंतूर या राज्यमहामार्गास गोल्डन रुटचा दर्जा दिलेला आहे. या दर्जानुसार सदरील रस्त्यावर दर अर्ध्या तासाला एक बस धावणे आवश्यक आहे. पण असा कुठलाही प्रकार या रस्त्यावर नेहमीच होताना दिसत नाही. यामुळेच खासगी वाहनधारकांना या रुटवर अच्छे दिन येत आहेत. असाच प्रकार 1 मे रोजी रात्री 8 ते 10 व 2 मे रोजी सायंकाळी 6:15 ते 8:20 वाजेपर्यंत तब्बल दोन तास एकही बस जिंतूरच्या प्लॅटफॉर्मवर लागली नव्हती. 

यामुळे मोठया प्रमाणात सलग सुट्टया व उन्हाळी सुट्टीमुळे तसेच लग्नसराईने याठिकाणी प्रवाशांची मोठी गर्दी जमा झाली होती. बस सोडण्यासाठी संबंधित नियंत्रण कक्षाकडे अनेक प्रवाशांनी धाव घेतली होती. हा प्रकार 1 मे रोजी घडला होता. तेवढयावरही बस सोडली नसल्याने शेवटी काही प्रवाशांनी चक्क जिल्हाधिकारी यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क साधल्यानंतर तत्काळ बस उपलब्ध झाली होती. यावेळी लहान-लहान चिमुकले घेऊन प्रवास करणार्‍या आई, बहिणींना तर जीव मुठीत घेऊन नाईलाजास्तव खासगी वाहनाने प्रवास करावा लागला. या असुविधेने मात्र बसच्या सुविधेबाबत प्रवाशांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.