Mon, Aug 19, 2019 11:39होमपेज › Marathwada › मुलीच्या वडिलांची मोफत दाढी-कटिंग 

मुलीच्या वडिलांची मोफत दाढी-कटिंग 

Published On: Feb 01 2018 1:41AM | Last Updated: Feb 01 2018 12:23AMकळमनुरी : प्रतिनिधी

येथील नाभिक समाजाच्या शरद सुरुशे या तरुणाने बेटी बचाव बेटी पढावचा सामाजिक संदेश देत नवजात मुलीच्या वडिलांची तीन महिने मोफत दाढी-कटिंग करून सामाजिक संदेश दिला. या उपक्रमाचा सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

सुरूशे यांचे नवीन बसस्थानक परिसरात छोटेखानी दाढी-कटिंगचे दुकान आहे. घरची परिस्थिती बेताचीच असल्याने याच व्यवसायातून ते आपल्या कुटुंबाची उपजीविका करतात. गेल्या काही वर्षांपासून देशामध्ये स्त्रीभ्रूण हत्येचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. यामुळे शासनाने स्त्री-भु्रण हत्या रोखण्यासाठी विविध योजना अमलात आणत मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली. आपण समाजाचे काही देणे लागतो, या उदात्‍त विचाराने प्रेरित होऊन सुरुशे यांनी राजमाता माँ जिजाऊ यांचा जन्मदिन व त्यांच्या मुलीचा जन्मदिन एकाच दिवशी असल्याने या दिवसाचे औचित्य साधून वरील प्रमाणे मोफत दाढी कटिंगचा उपक्रम हाती घेतला आहे.  नुकत्याच जन्मलेल्या मुलींच्या पित्याची ती महिने मोफत दाढी-कटिंग करून बेटी बचाव बेटी पढावचा सामाजिक संदेश सुरूशे यांनी दिला आहे.

शासनाच्या सुकन्या योजनेअंतर्गत पोस्ट कार्यालयामध्ये अनेक मुलींचे खातेही काढून दिले. काही गोरगरीब कुटुंबाचा तर पहिला हप्‍ता आपल्या ऐपतीप्रमाणे भरून दिला. याचप्रमाणे राजमाता माँ जिजाऊ जन्मदिनानिमित्त व स्वतःच्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य तसेच धान्यवाटप केले आहे.