Wed, Jul 17, 2019 12:34होमपेज › Marathwada › तपासामुळे ‘त्या’ मुलीस मिळणार आई-वडील

तपासामुळे ‘त्या’ मुलीस मिळणार आई-वडील

Published On: Jun 01 2018 2:07AM | Last Updated: May 31 2018 11:17PMबीड : प्रतिनिधी 

बाळाची आदला-बदल झाल्याचा आरोप थिटे दाम्पत्यासह नातेवाइकांनी केल्यानंतर खळबळ उडाली होती. हे प्रकरण शहर ठाण्यात गेल्यानंतर पोलिस निरिक्षक सय्यद सुलेमान यांनी प्राथमिक तपास वेगाने लावला, तसेच किचकट प्रकरण असल्याने त्या बाळाच्या पायाचे ठसे घेऊन तपासणीसाठी पाठविले. त्यानंतर डीएनए तपासणीचा पर्याय निवडला. डीएनएचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने गुरुवारी ते बाळ आई-वडिलांकडे सुपूर्द करण्यात येणार होते, मात्र रात्री सात वाजेपर्यंत ते दाम्पत्य बीड शहरात आले नव्हते. सदरील बाळ औरंगाबादच्या  घाटी रुग्णालयात दाखल आहे. 

बीड जिल्हा रुग्णालयात छाया राजू थिटे या महिलेने 11 मे रोजी बाळाला जन्म दिला. पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केल्यानंतर 21 मे रोजी बाळाची आदला-बदल झाल्याचा आरोप थिटे दाम्पत्यासह नातेवाइकांनी केला. या प्रकरणाची नोंद पोलिसात झाल्यानंतर पोनि.सय्यद सुलेमान यांनी तत्काळ तपासाला सुरुवात केली. जिल्हा आणि खासगी रुग्णालयातील कर्मचार्‍यांचे जबाब नोंदवून घेतले. 

प्रसूती कक्षापासून ते व्यवस्थापन कक्षापर्यंत ज्या-ज्या ठिकाणी नोंदी झाल्या होत्या ते सर्व रेकॉर्ड तपासले. दोन्ही रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी केली. बाळाच्या पायाचे ठसे तपासणीसाठी पाठवले. एवढ्यावरच न थांबता थिटे दाम्पत्य आणि बाळाच्या रक्ताचे नमुने घेतले. डीएनए चाचणीसाठी औरंगाबादला पाठवले. सदरील अहवाल आणण्यासाठी स्वतंत्र कर्मचारी नियुक्त करून त्यास औरंगाबादला पाठवले. बुधवारी सायंकाळी डीएनए अहवाल बीडमध्ये येऊन धडकताच बाळाच्या आदला-बदल प्रकरणावर एकदाचा पडदा पडला. 

रिपोर्टमुळे सत्य आले समोर : डॉ. जेथलिया

डीएनएमुळे या प्रकरणातील सत्य समोर आले आहे. पोलिस प्रशासनाने गतीने तपास केला. जिल्हा आरोग्य प्रशासनानेही केलेली मदत महत्वपूर्ण ठरल्याचे श्री बाल रुग्णालयाचे डॉ. सचिन जेथलिया यांनी सांगितले. या प्रकरणामुळे रुग्णालयावरील विश्वासाला तडा जाण्यास सुरुवात झाली होती, परंतु डीएनए रिपोर्टमुळे श्री बाल रुग्णालयासह डॉक्टर्स व तेथील स्टाफवरील विश्वास वृद्धींगत झाल्याचे सांगून बाळाची प्रकृती चिंताजनक असताना त्यास दाखल करून घेत औषधोपचार केले. बाळाच्या पायाचे ठसे आमच्यासमोर घेतलेले नाही, बाळाचे डायपर बदलू दिले नाही, अशा प्रकारचे चुकीचे जबाब नातेवाइकांनी नोंदविले याचे दु:ख वाटत असल्याची खंत डॉ. जेथलिया यांनी व्यक्‍त केली.