Sat, Apr 20, 2019 10:22होमपेज › Marathwada › बीड : गोवरची लस दिल्याने बालिकेचा मृत्यू

बीड : गोवरची लस दिल्याने बालिकेचा मृत्यू

Published On: Jan 28 2018 6:53PM | Last Updated: Jan 28 2018 6:34PMपरळी : प्रतिनिधी 

शहरातील वटसावित्रीनगर भागातील एका नऊ महिन्याच्या बालिकेचा गोवरची लस दिल्याने मृत्यू झाला. आरती नंदू जाधव (वय ९ महिने) असे मृत बालिकेचे नाव आहे. आज सकाळी ही दुर्घटना घडली. या धक्‍कादायक घटनेनंतर रुग्‍णालयात खळबळ उडाली. 

आरोग्य विभागाच्या वतीने ९ महिने तसेच दीड वर्षे वयाच्या बालकांना मेंदूज्‍वर व गोवरची लस देण्यात येते. आज वटसावित्रीनगर भागातील आरोग्य सेविका व आशा सेविकांच्या मार्फत लस देण्यात आली. याच भागात राहणार्‍या आरती जाधव हिलाही ही लस दिली होती. त्यानंतर तिला ताप येऊन अंगावर लाल फोड आले. यातच तिचा मृत्यू झाला असा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे. 

नातेवाईकांनी शहर पोलिसांत धाव घेऊन संबंधित लस देणार्‍या सेविकेवरती गुन्‍हा नोंद करण्याची मागणी केली. पोलिसांनी शववविच्‍छेदन अहवालानंतर जबाबदार व्यक्‍तीवर गुन्‍हा नोंद केला जाईल, असे सांगितले. अंबाजोगाई येथील शासकीय रुग्‍णालयात आरतीचा मृतदेह शवविच्‍छेदनासाठी नेण्यात आला आहे. तर त्याच भागातील लक्ष्‍मी निखल गवळी (१.५ वर्षे) या बालिकेसही लस दिल्याने ताप आला होता. मात्र, तिच्यावर पालकांनी उपजिल्‍हा रुग्‍णालयात उपचार करून घेतले. 

आज सर्वत्र राष्ट्रीय पल्स पोलीओ मोहीम सुरू होती. परंतु, सोशल मीडियावर बालक मृत्यू झाल्याची माहिती फिरताच अनेकांनी बालकांना पोलीओ डोस पाजण्याचे टाळले.

वटसावित्रीनगर भागातील सात बालकांना लस देण्यात आलेली आहे. मृत बालिकेस तापही आला नव्हता. तिचा मृत्यू कशामुळे झाला हे शवविच्छेदन अहवाल आल्यावरच समजेल. त्या भागात लस घेतलेल्या बालकांच्या पालकांमध्ये भिती निर्माण झाल्याने ते उपजिल्हा रूग्णालयात बालकांना आणीत आहेत. 
- डॉ संजय गित्ते, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रूग्णालय परळी