Mon, Mar 25, 2019 13:15होमपेज › Marathwada › राजकीय वारसा जपत शेतामध्ये फुलविली बाग

राजकीय वारसा जपत शेतामध्ये फुलविली बाग

Published On: Jun 29 2018 12:56AM | Last Updated: Jun 29 2018 12:16AMउमापूर : राजेंद्र नाटकर

राजकारणाचा गंध लागताच अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणारे कार्यकर्ते सध्या सर्वत्र दिसत असले तरी राक्षसभुवन येथील शेतकर्‍याने राजकीय वारसा जपत आपल्या शेतातही बाग फुलवून तरुण कार्यकर्त्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे.

गेवराईपासून 22 कि. मी. अंतरावर व गोदावरी पात्राच्या काठी राक्षसभुवन येथील नाटकर कुटुंबाचा हा आदर्श आहे. राक्षसभुवनसह परिसरात प्रगतशिल शेतकरी कुटुंब म्हणून भाऊसाहेब नाटकर यांच्या कुटुंबाची ओळख आहे. एकीकडे शेतीचा वारसा असला तरी दुसरीकडे या कुटुंबाला राजकारणाचाही वारसा आहे. माजी मंत्री शिवाजीराव पंडित यांच्यापासून हे कुटुंब सक्रिय राजकारणात आहे. 
असे असले तरी भाऊसाहेब नाटकर यांची शेतीशी असलेली नाळ अद्यापही घट्ट आहे. नाटकर यांनी 60 एकर शेतीमध्ये योग्य नियोजन केले आहे.  25 एकर ऊस, दोन एकर पपई, दोन लिंबुनी, दोन एकर सीताफळ अशा बाग फुलविल्या आहेत. या बागांतून त्यांना लाखोंचे उत्पन्न निघत आहे.

नाटकर कुटुंबीयांनी राजकारणात अनेक पद सांभाळली आहेत. त्यामुळे त्यांना जनमाणसातही चांगला राबता आहे. भाऊसाहेब नाटकर यांचे 22 जणांचे एकत्र कुंटुब आहे. दोन भाऊ, पुतणे या सर्वांच्या मदतीने शेतीमध्ये नवनवीन प्रयोग राबवून ते यशस्वी केलेले आहेत. नाटकर यांनी ऊस पिकाचेही विक्रमी उत्पादन काढले आहे. यासह पपई, लिंबोणी आदींच्या बागांचेही चांगले व्यवस्थापन केल्याने शेतकरी सल्ला घेण्यासाठी येतात. राजकारणात न भरटकता शेतीचा त्यांनी आदर्श निर्माण केला आहे.