Fri, Apr 19, 2019 11:57होमपेज › Marathwada › साहित्यिकांनी जागवल्या डॉ. गंगाधर पानतावणे यांच्या आठवणी

साहित्यिकांनी जागवल्या डॉ. गंगाधर पानतावणे यांच्या आठवणी

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

परभणी : 

आंबेडकरी चळवळीतील सुप्रसिध्द विचारवंत तथा विद्रोही साहित्यिक प्रा.डॉ.गंगाधर पानतावणे यांच्या निधनाने मराठी साहित्यात अस्मितादर्श चळवळीतून लेखकांच्या तीन पिढ्या उभ्या करणारा मार्गदर्शक हरपल्याची भावना साहित्यिकांनी व्यक्त केली. त्यांच्या निधनाने दलित चळवळीचेही मोठे नुकसान झाल्याची प्रतिक्रिया कार्यकर्त्यामधून व्यक्त झाली.

गुरुवर्य डॉ.पानतावणे यांचे व्यक्तिमत्त्व दुर्मिळ  

औरंगाबाद येथे शिकताना 1985 ते 87 या काळात डॉ.गंगाधर पानतावणे यांचा विद्यार्थी म्हणून मला सहवास मिळाला. शिवाय विश्‍व मराठी साहित्य संमेलनातही अमेरिकेत त्यांच्या सहवासात राहयला मिळाले. पानतावणे सरांनी आपल्या आयुष्याच्या 50 वर्षांत  साहित्य क्षेत्रात नवीन क्रांती केली. अस्मितादर्श साहित्य संमेलनातून नवसाहित्यिकांना व्यासपीठ मिळवून देत लेखकांची पिढी घडवली. पानतावणे सरांचे व्यक्तिमत्त्व दुर्मिळ होते.  त्यांच्या जाण्यामुळे दुःखाचा डोंगर कोसळला असून मराठी साहित्यामध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
 प्रा.डॉ. इंद्रजित भालेराव

दलित वेदनेचा हुंकार गेला 

डॉ.पानतावणे सर हे दलित साहित्य चळवळीतील मराठवाड्यातील अग्रगण्य लेखक होते. दलित वेदनेचा हुंकार त्यांनी आपल्या साहित्यातून प्रकट केला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि कार्याचा वारसा त्यांनी डॉ.आंबेडकर यांच्यानंतर साहित्यातून, कार्यातून पुढे नेला. दलित साहित्य व आंबेडकरी चळवळीची त्यांच्या जाण्याने फार मोठी हानी झाली आहे. 
- डॉ. अशोक जोंधळे  

चळवळीचा भाष्यकार हरपला 

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकारिता आणि विविध पैलू सुलभ वाणीतून सर्वांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य डॉ.पानतावणेे यांनी केले आहे. अस्मितादर्श साहित्य संमेलनाच्या निमित्ताने सरांना जवळून पाहता आले. प्रचंड अभ्यास आणि चिंतनाच्या माध्यमातून  पहिल्या जागतिक मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद, पद्मश्री अशा अनेक उपाधींनी त्यांना सन्मानित केले गेले. साहित्यातील मानवतावाद आचरणामध्ये झिरपावा हा त्यांचा नेहमीच प्रयत्न होता. 
-डॉ. भीमराव खाडे

तीन पिढ्यांचे संस्कार केंद्र हरपले 

प्रा.डॉ.पानतावणे सर पुस्तकांच्या भावविश्‍वात रममाण होणारे चालते बोलते विद्यापीठ होते. आधुनिक भारतातील वास्तव जीवनाची मांडणी करुन परिवर्तनाची प्रेरणा देणार्‍या सरांना अ.भा.मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद मिळायला हवे होते .  तीन पिढ्यांचे संस्कार केंद्र असलेल्या सरांनी विद्रोहाला सम्यक पध्दतीने शब्दबध्द करतानाच अस्मितादर्शच्या अव्याहत उपक्रमाने मराठी साहित्याला नवे परिमाण प्रदान केले हे निर्विवाद आहे.

-यशवंत मकरंद

आंबेडकरी साहित्याचा थिंक टँक हरपला 

डॉ. पानतावणे हे आंबेडकरी चळवळीचे थिंकटँक होते. साहित्यातून सम्यक विचारांची मांडणी करतानाच अस्मितादर्श चळवळीच्या माध्यमातून त्यांनी असंख्य माणसे जोडली.सर्वसामान्यांतून साहित्यिक घडवले. परभणीतील अस्मितादर्श साहित्य संमेलनाच्या वेळी त्यांचा जवळून संबंध आला. 
-कवी सुरेश हिवाळे

मराठी साहित्याचे सोनेरी पान हरपले  

मराठी साहित्य विशेषतः आंबेडकरी साहित्यातील डॉ. पानतावणे हे सोनेरी पान आहेत. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर अस्मितादर्शच्या माध्यमातून आंबेडकरी चळवळ प्रसारित करण्याचे कार्य डॉ.पानतावणे सरांनी केले आहे. अस्मितादर्शसारखे व्यासपीठ निर्माण करून सरांनी साहित्यिक घडविले.

-डॉ. सुरेश शेळके  


मराठी साहित्याचे मोठे नुकसान :  

प्रा.डॉ.पानतावणे यांच्या निधनाने पहिल्या फळीतील ज्येष्ठ दलित साहित्यिक आम्ही गमावला आहे.त्यांच्या जाण्याने मराठी साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे.अस्मितादर्श पोरका झाला.अस्मितादर्शने अनेक आंबेडकरी साहित्यिक निर्माण केले. उत्कृष्ट शिक्षक, साहित्यिक,  समीक्षक,  वक्ता आणि लेखक आपल्यातून गेला.

प्रा.अरुणकुमार लेमाडे

लेखक-वाचकांची पिढी निर्माण केली :

डॉ.पानतावणे यांनी साहित्यक्षेत्राला खूप मोठे योगदान दिले आहे. अस्मितादर्शच्या माध्यमातून त्यांनी लेखक व वाचकांची पिढी निर्माण केली आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा जपत त्यांनी मराठी साहित्यामध्ये परिवर्तनवादी साहित्य निर्मितीला नेहमीच प्रोत्साहन दिले आहे.

-प्रेमानंद बनसोडे

साहित्यक्षेत्र मार्गदर्शकाला मुकले :  

डॉ. गंगाधर पानतावणे हे साहित्य क्षेत्राचे मार्गदर्शक होते. प्रत्यक्ष ओळख नसतानाही नव साहित्यिकांना फोनवरही मार्गदर्शन करून प्रेरणा देणारे पानतावणे सर कायम आठवणीत राहतील. साहित्यिकांचा आधारवड अन् फुले-शाहू-आंबेडकर विचारांचे प्रसारक म्हणून त्यांनी केले कार्य हे कायम आठवणीत राहिले.

 - अंजली धूतमल
 


  •