Mon, May 27, 2019 01:12होमपेज › Marathwada › बनावट विवाह करून लुटणारी टोळी कार्यरत

बनावट विवाह करून लुटणारी टोळी कार्यरत

Published On: May 16 2018 1:38AM | Last Updated: May 16 2018 1:38AMबीड : प्रतिनिधी

खोटा विवाह करून औरंगाबाद तालुक्यातील एका कुटुंबाला लाखो रुपयांचा गंडा घालून फरार झालेल्या तरुणीसह औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी केज शहरातून सोमवारी ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान यामागे एक टोळी कार्यरत असल्याचे समोर आले आहे. नवरीच्या कुटुंबाला दीड लाख रुपये रोख रक्कम देण्याच्या बदल्यात माजलगाव येथील प्रीतीचा (नाव बदलले आहे) विवाह औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील घोडेगाव येथील एका तरुणासोबत ठरला. हा विवाह नांदेड येथील मध्यस्थ महिलेच्या पुढाकारातून ठरला होता. ठरल्याप्रमाणे वराच्या भावाने एक लाख रुपये रोख रुपये मध्यस्थ महिलेच्या हाती सोपविले आणि 50 हजारांचा बस्ताही खरेदी करून दिला. 20 डिसेंबर 2017 रोजी कायगाव येथील रामेश्वर मंदिरात नातेवाइकांच्या उपस्थितीत हे लग्न लावून देण्यात आले. 

तीनच दिवसांत म्हणजे 23 डिसेंबर रोजी, माझे वडील आजारी असून मला त्यांना भेटण्यासाठी तत्काळ बीडच्या शासकीय रुग्णालयात जायचे आहे, तुम्ही मला घेऊन चला असा बनाव प्रीतीने केला. त्यामुळे प्रीतीचे दोन्ही दीर तिला आणि तिच्या मावशीला घेऊन बीडला आले. बीडच्या शासकीय रुग्णालयासमोर येताच प्रीती आणि तिच्या मावशीने नैसर्गिक विधीचा बहाना करून वाहनातून पळ काढला. यासाठी तिथे आधीपासूनच उभ्या असलेल्या एका कारमध्ये जाऊन बसल्या. त्यांच्यापाठोपाठ दोघेही दीर त्या कारजवळ गेले असता कारमधील व्यक्तींना त्यांना मारहाण करून पुन्हा बीड जिल्ह्यात आल्यास जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने हताश झालेल्या दिराने नांदेड येथील मध्यस्थी महिलेस फोन केला आणि दीड लाख रुपये वापस मागितले. त्या महिलेने आधी उडवाउडवीची उत्तरे दिली, नंतर मात्र तिने तिच्या मुलीसाठी एक लाख रुपये देणारा नवरा मुलगा शोध, त्यानंतर तुझे पैसे वापस करते असे सांगितले. दिरानेही तिला होकार दर्शविला आणि या प्रकारची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी सापळा रचून मध्यस्थ महिलेस गंगापूरला बोलवून ताब्यात घेतले. तिची चौकशी केल्यानंतर यामागे एक टोळी कार्यरत असल्याचे उघड झाले. 
  

या टोळीत नांदेड, बीड जिल्ह्यातील काही महिला आणि पुरुष सामील असल्याचेही समोर आले आहे. खोटा विवाह लावून नवरदेवाच्या कुटुंबाला गंडा घालण्याचे काम ही टोळी करत होती. या माहितीच्या आधारे गंगापूर पोलिसांनी पाळत ठेवून, फोनच्या लोकेशनवरून तसेच केज पोलिसांच्या मदतीने केज शहरातून डॉली आणि तिच्या आईला केज शहरातून ताब्यात घेतले आहे. या टोळीने आणखी कोणाला याच पद्धतीने गंडा घातला आहे का याचा उलगडा चौकशीनंतरच होणार आहे.