Sat, Jul 20, 2019 10:37होमपेज › Marathwada › सामूहिक विवाहासाठी मिळणार मदत

सामूहिक विवाहासाठी मिळणार मदत

Published On: Mar 16 2018 1:22AM | Last Updated: Mar 16 2018 1:22AMबीड : प्रतिनिधी

आत्महत्याग्रस्त शेतकरी, गोरगरीब शेतकर्‍यांची मुले-मुली तसेच गरीब लोकांच्या पाल्यांचा सामूहिक विवाह करण्यासाठी बीड येथील धर्मादाय उपआयुक्‍तांनी बोलाविलेल्या पहिल्या बैठकीस देवस्थान विश्‍वस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बीड, गेवराई, माजलगाव व वडवणी या तालुक्यातील संस्थांनी सामूहिक विवाह सोहळ्यासाठी आर्थिक मदत देण्यास गुरुवारी संमती दिली. जवळपास दहा लाख रुपयांची मदत देण्याची जबाबदारी विश्‍वस्थांनी उचलली.

बीड शहरातील सोनाजीराव क्षीरसागर होमिओपॅथी मेडिकल कॉलेजच्या एका हॉलमध्ये गुरुवारी सदरील बैठक पार पडली. या बैठकीस धर्मादाय कार्यालयाचे उपायुक्‍त श्रीमती के. आर. सुपाते, सहायक धर्मदाय आयुक्‍त एस. पी. पाईकराव, के. बी. कामगौडा यांची प्रमुख उपस्थिती होती. गोरगरीब शेतकर्‍यांची मुले-मुली तसेच गरीब लोकांच्या पाल्यांच्या सामूहिक विवाहाचा मुद्दा या बैठकीत मांडला गेला. गरीब शेतकरी तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल पालकांच्या मुला-मुलींसाठी सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करून लग्‍नकार्यासाठी स्वच्छेने मदत करण्याचे आवाहन करण्यात आले. या उपक्रमास सहकार्य करण्याची समंती यावेळी उपस्थितांनी दिली. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निरीक्षक ए. पी. वानखेडे, प्रास्ताविक सहायक आयुक्‍त के. बी. कामगौडा, मार्गदर्शन सहायक आयुक्‍त एस. पी. पाईकराव यांनी केले. या बैठकीस सामाजिक कार्यकर्त्या मनीषा तोकले, कार्यालयीन अधीक्षक बी. एच. शेकडे, निरीक्षक हुंबे, लोंढ, फड उपस्थित होते.

जवळपास दहा लाख रुपयांची मिळणार मदत

बैठकीदरम्यान, लोकाशा प्रतिष्ठानने मंगळसूत्र, श्री मन्मथस्वामी देवस्थान कपिलधार यांनी अन्‍नदान, श्री जगदंबा देवी मंदिर संस्थान तलवाडा यांनी 1 लाख 11 हजार रुपये, शारदा प्रतिष्ठान गेवराई यांनी सामूहिक विवाहाचे नियोजन, रेणुकामाता संस्थान वडवणी यांनी साड्या, मारोती संस्थाान गोलांग्री यांनी 21 हजार रुपये, हनुमान मंदिर राजुरी वेस बीड यांनी 11 हजार रुपये, बुखारी एज्युकेशन सोसायटी यांनी निधी, बेलेश्‍वर संस्थान, कंकालेश्‍वर संस्थान यांनी अन्‍नदान व इतर विश्‍वस्थ मंडळींनी  दाननिधी, अन्‍नदान, मंगळसूत्र, वधू-वर साड्या, आदी मदत देण्याचे यावेळी जाहीर केले.