Sun, Mar 24, 2019 17:28होमपेज › Marathwada › 1210 अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांसाठी 70 लाखांचा निधी

1210 अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांसाठी 70 लाखांचा निधी

Published On: Jul 13 2018 12:49AM | Last Updated: Jul 12 2018 10:31PMपरभणी : प्रतिनिधी

जिल्ह्यात एप्रिल ते ऑक्टोबर 2017 या कालावधीत झालेली अतिवृष्टी व अवेळी आलेल्या पावसामुळे एकूण क्षेत्रफळापैकी तब्बल 1 हजार 210 शेतकर्‍यांची 1 हजार 27 हेक्टर 78 आर शेतजमीन बाधित झाली होती. या नुकसानीपोटी शेतकर्‍यांना अनुदान देण्याकरिता शासनाने 70 लाख 7 हजाराचा निधी मंजूर केला आहे. 

केंद्र शासनाच्या वतीने नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित होणार्‍या व्यक्‍तींना व शेतकर्‍यांना अनुदान देण्यासाठी मदतीचे दर निकषाची घोषणा केली. यानुसार राज्य शासनाच्या वतीने नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित होणार्‍या आपद्ग्रस्त व्यक्‍तींना मदतीचे दर व निकष 2010 ते 2015 या कालावधीकरिता शासन निर्णयातून निश्‍चित केले गेले. याच मदतीचे दर पुन्हा एकदा 2015 ते 2020 या कालावधीसाठी निश्‍चित करण्यात आले आहेत. परभणी जिल्ह्यात एप्रिल ते ऑक्टोबर 2017 या कालावधीत अतिवृष्टी व अवकाळी पाऊस पडला होता. यामुळे शेतीपिकांचे, फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याच्या सूचना क्षेत्रिय अधिकार्‍यांना दिल्या होत्या. या पंचनाम्यानंतर नुकसानीत अडकलेल्या शेतकर्‍यांना तत्काळ मदत देण्याबाबतचा ठराव मंजूर करण्यासाठी तो मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडला गेला. यात 5 जून 2018 रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत ही मदत वाटप करण्यासाठी निधी उपलब्ध करण्यास मान्यता देण्यात आली आहे.  पंचनामा अहवालानुसार जिल्हयातील 1 हजार 210 शेतकर्‍यांचे 1 हजार 27 हेक्टर 78 आर क्षेत्रातील नुकसान झाल्याचा अहवाल सादर झाला. यामुळे संबंधित शेतकर्‍यांना अनुदानापोटी वाटप करण्याकरिता 70 लाख 7 हजाराचा निधी मंजुरीस नुकतीच मान्यता मिळाली आहे. या निधीचे उपलब्धतेनंतर वाटप केले जाणार आहे.