Tue, Mar 26, 2019 02:19होमपेज › Marathwada › रानडुकरांना आता शार्पशूटर्सचा ‘धसका’

रानडुकरांना आता शार्पशूटर्सचा ‘धसका’

Published On: Jul 29 2018 1:23AM | Last Updated: Jul 29 2018 1:14AMपाटोदा : प्रतिनिधी 

पाटोदा तालुक्यात अनेक ठिकाणी शेतकर्‍यांना रानडुकरांचा प्रचंड त्रास सहन करावा लागतो. ही रानडुकरे शेतातील पिकांची पूर्णपणे नासाडी करतात, परंतु आता या रानडुक्कर निर्मूलनासाठी आ. सुरेश धस यांच्या पुढाकारातून खास हैदराबाद येथील ‘शार्पशूटर’ची टीम आष्टी-पाटोद्यात दाखल झाली आहे. आता पाटोदा परिसरात वन विभागाची परवानगी घेऊन रानडुक्कर निर्मूलनाची मोहीम सुरू करण्यात आली आहे. 

निसर्गाची सततची अवकृपा व अवर्षणाचा सामना करणार्‍या आष्टी मतदारसंघात शेतकरी मोठ्या कष्टाने पिके फुलवतात, मात्र नैसर्गिक आपत्तीबरोबरच रानडुकरांमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. यंदा शेतकर्‍यांची पिके वाचवण्याच्या दृष्टिकोनातून आ. सुरेश धस यांच्या पुढाकारातून 25 जुलैपासून मतदारसंघात शार्पशूटरच्या मदतीने रानडुक्कर निर्मूलनाची मोहीम सुरू करण्यात आली आहे. रानडुकरे शेतातील पिके तर फस्त करतातच पण शेतकर्‍यावर हल्ला करायलाही मागे-पुढे पाहत नाही. त्यामुळे आष्टी, पाटोदा व शिरूर या तीनही तालुक्यातील त्रस्त शेतकर्‍यांनी आ. सुरेश धस यांच्याकडे प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याची मागणी केली होती. आ. धस यांनी पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या वाढदिवसाचे  औचित्य साधून वनविभागाची परवानगी घेत रानडुक्कर निर्मूलनाची मोहीम हाती घेतली आहे. धस यांनी हैदराबाद येथून शार्पशूटर बोलावले असून बुधवारी (दि.25 जुलै) रात्रीपासून रानडुक्कर निर्मूलनाची मोहीम सुरू करण्यात आली आहे. 26 जुलैपासून पाटोदा तालुक्यातील डोंगरकिन्ही, नायगाव, निरगुडी या ठिकाणी शार्पशूटरच्या माध्यमातून रानडुक्कर मारली जाणार आहेत, तसेच ही मोहीम आष्टी मतदार संघात सहा महिने राबविण्यात येणार आहे. आष्टी तालुक्यातील ज्या-ज्या गावांत रानडुकरांमुळे पिकांचे नुकसान होत आहे, त्या ठिकाणच्या शेतकर्‍यांनी आपापल्या तालुका वनविभाग कार्यालयात अर्ज करावेत. ज्या गावचे अर्ज जास्त येतील, त्या गावात शार्पशूटरच्या सहाय्याने रानडुक्कर निर्मूलनाची ही मोहीम राबविण्यात येणार असल्याचे आ.धस यांनी सांगितले.