होमपेज › Marathwada › गंगाखेडात पाच घरफोड्या

गंगाखेडात पाच घरफोड्या

Published On: May 22 2018 1:28AM | Last Updated: May 21 2018 10:15PMगंगाखेड : प्रतिनिधी

शहरातील न्यायालयाच्या आवारातील न्यायाधीशांच्या शासकीय निवासस्थानासह बळीराजा कॉलनीतील चार नागरिकांच्या घरात शिरून चोरट्यांनी दि.21 मे रोजी मध्यरात्री डल्ला मारला. यामध्ये न्यायाधीशांच्या घरातील एलसीडी टीव्ही पळवित इतर नागरिकांच्या घरातील लाखोंचा ऐवज लंपास करण्यात आला. घटनास्थळी पोलिसांनी श्‍वानपथकासह ठसे तज्ञास पाचारण केले. या घटनेने भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने शहरातील कायदा व सुव्यस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

शहरातील न्यायालय परिसरात अनेक न्यायाधीशांची निवासस्थाने आहेत. उन्हाळाच्या सुट्टीमुळे अनेक न्यायाधीश बाहेरगावी गेल्याचा फायदा चोरट्यांनी घेतला. दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर न्यायधीश शिराळे यांच्या निवासस्थानी चोरट्यांनी दि.21 मे रोजी रात्री 2 वाजण्याच्या सुमारास चॅनल गेट व मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून एलसीडी टीव्ही चोरट्यांनी चोरून नेला. तसेच न्यायाधीश देशमुख यांच्या निवासस्थानाचे चॅनल गेटचे कुलूप तोडून मुख्य दरवाजाचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला. पण तो अयशस्वी झाला.

चोरट्यांनी शेजारी असलेल्या बळीराजा कॉलनीत शिरकाव करून परगावी गेलेले वामनराव डोंगरे यांच्या घराचे कुलूप तोडून कपाटातील सोन्याचे 7 ग्रॅमचे झुंबर असे रोख 2 लाख 95 हजारांवर डल्ला मारला तर शेजारी असलेले मारुती उबाळे यांच्या घराचे कुलूप तोडून कपाटातील 20 ग्रॅॅमचे मिनी गंठण, 5 ग्रॅमचे कानातले वेल,  रोख 5 हजार रुपयांवर डल्ला मारला. जवळ असलेल्या मारुती गरड यांच्याही घराचे कुलूप तोडून कपाटातील 5 ग्रॅम सोन्याची अंगठी, 7 ग्रॅम वजनाचे कानातले झुंबर, रोख 1600 रुपयांवर डल्ला मारला. श्‍वानपथकासह ठसे तज्ज्ञांच्या पथकास पाचारण करण्यात आले होते. सदरील श्‍वान हे रेल्वे रुळांपर्यतच गेले. नामदेव कणिराम राठोड यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पो. नि. सोहन माछरे करत आहेत.