Tue, May 21, 2019 18:56होमपेज › Marathwada › पाण्याचा सुकाळ, मत्स्यबीजांचा दुष्काळ

पाण्याचा सुकाळ, मत्स्यबीजांचा दुष्काळ

Published On: Feb 21 2018 1:20AM | Last Updated: Feb 21 2018 1:20AMबीड : दिनेश गुळवे

धुवांधार झालेल्या पावसाने जिल्ह्यातील धरणे तुडुंब भरल्याने पाण्याचा सुकाळ असला तरी मत्स्यबीजांचा मात्र दुष्काळ असल्याचे दिसून येत आहे. 

जिल्ह्यातील एकमेव असलेले धनेगाव (मांजरा धरण) येथील मत्स्यबीज केंद्र बंद असल्याने मत्स्यबिजांसाठी व्यावसायिकांना पुणे, मुंबईसह परराज्यात जावे लागत आहेत. वेळीच मत्स्यबीज न मिळणे, वेळेच तलावांचे ठेके न होणे यासह इतर कारणांचा फटका जिल्ह्यातील मत्स्य शेतीस होत असल्याचे दिसून येत आहे. धरणांमध्ये मुबलक पाणी असतानाही उद्दिष्ठांएवढेही मत्स्य उत्पादन होण्यात अडचणी निर्माण होत आहेत. 

जिल्ह्यामध्ये धरणे, छोटे तलाव यांची संख्या मोठी आहे.200 हेक्टरपेक्षा अधिक क्षमता असलेले दोन धरणे जिल्ह्यात असून याखाली हेक्टरक्षमता असलेले 148 प्रकल्प आहेत. या प्रकल्पांमध्ये मासेमारी केली जाते. जिल्ह्यातील माजलगाव व मांजरा प्रकल्पातून मासेमारीचे चांगले उत्पादन मिळते. गतवर्षीपासून पाऊस चांगला होत असल्याने माशांचे उत्पादनही बर्‍यापैकी आहे. यावर्षी मत्स्य विकास कार्यालयास 65 लाखांचा महसूल मिळाला आहे.

जिल्ह्यातील 153 प्रकल्पांमध्ये पाच हजार 750 मे टन मत्स्य उत्पादनाचे उद्दिष्ट आहे. मत्स्य व्यवसाय हा सामान्य कुटुंबाला रोजगार देणारा असल्याने  मत्स्य व्यवसाय वाढविण्यावर भर दिला जात आहे. जिल्ह्यातील मत्स्य उत्पादकांना मत्स्य बीज आणण्यासाठी पुुणे, मुंबई, किल्लारी, हैदराबाद, नाशिक आदी ठिकाणी जावे लागत होते. जाण्या-येण्यासह मत्स्यबीजावरही मोठा खर्च होत होता. हिच अडचण ओळखून धनेगाव येथे मत्स्य बीज उत्पादन केंद्र सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणचे मत्स्य बीज मत्स्य शेती करणार्‍यांना कमी खर्चात मिळते. असे असले तरी हे केंद्र मागील तीन वर्षांपासून बंद आहे. त्याचा फटका मत्स्य शेती करणार्‍या व्यावसायिकांना बसतो. त्यांना दूरवरून मत्स्य बीज आणावे लागते, यावर मोठा खर्च होतो. शिवाय, वेळेच मत्स्य बीज मिळणेही कठीण जाते.

अधिकारी प्रभारी
मत्स्य विकास कार्यालयातील प्रमुख अधिकारी प्रभारी आहेत, त्यांच्याकडे बीडसह अन्य ठिकाणचा कारभार आहे. याचा फटकाही मत्स्य विकास व व्यावसायीकांना बसत आहे. जिल्ह्यातील प्रकल्पांचे ठेके देण्यास विलंब होत आहे. यामुळे मत्स्य उत्पादनावर परिणाम होत आहे. मत्स्य शेती करणार्‍यांना मत्स्य बीज जिल्ह्यातच मिळावे, यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी होत आहे.