Sun, Apr 21, 2019 14:27होमपेज › Marathwada › यवतमाळमध्ये राज्यातील पहिला समलैंगिक विवाह

यवतमाळमध्ये समलैंगिक विवाह!

Published On: Jan 12 2018 6:14PM | Last Updated: Jan 12 2018 6:14PM

बुकमार्क करा
यवतमाळ : पुढारी ऑनलाईन

भारतात समलिंगी विवाहाला कायदेशीर परवानगी नाही. मात्र, यावरून देशात सतत चर्चा झडत असतात. यातच यवतमाळ येथे नुकत्याच झालेल्या समलिंगी विवाहामुळे लोकांनी तोंडात बोटे घातली आहेत. येथील एका पुस्‍तक विक्रेत्याच्या मुलाने इंडोनेशियात राहणार्‍या आपल्या समलिंगी सहकार्‍याबरोबर विवाह केला. 

३० डिसेंबर रोजी शहरातील एका अलिशान हॉटेलमध्ये हा विवाह सोहळा संपन्‍न झाला. यानंतर सोशल मीडियावर या विवाहाचे फोटो व्‍हायरल झाले आणि लोकांमध्ये उत्‍सुकतेने याबद्दल चर्चा सुरू झाली. हे समलिंगी जोडपे अमेरिकेतील एका कंपनीत एकत्र काम करत असून तिथे ते लिव्‍ह इन रिलेशनशिपमध्ये होते. 

सर्वसाधारणपणे आई-वडिलांची इच्छा असते की मुलाचे योग्य वयात लग्न व्हावे. यासाठी लग्न कर म्हणून आई-वडील त्या तरूणाच्या मागे लागले होते. पण, त्या तरूणाचे ऑफिस सहकाऱ्यावर प्रेम जडले होते. यामुळे तो सतत टाळाटाळ करत होता. अखेर त्याने यवतमाळला येऊन आई-वडिलांना प्रेमाची कबुली दिली. 

मुलाचे प्रेमप्रकरण ऐकल्यानंतर त्याच्या आई-वडिलांनी नकार दर्शवला. पण, या तरूणाच्या हट्टापुढे त्यांनी हार मानली आणि यवतमाळच्या प्रसिद्ध हॉटेलमध्ये वैदिक पद्धतीने हा विवाहसोहळा पार पडला. विशेष म्‍हणजे या सोहळ्यासाठी परदेशातूनही पाहुणे आले होते. चीन व अमेरिकेतून ७० ते ८० वर्‍हाडी या सोहळ्यासाठी उपस्‍थितीत होते. यातील १० समलिंगी जोडपी होती.