Mon, Apr 22, 2019 12:30होमपेज › Marathwada › पीककर्ज न वाटल्याने बँक अधिकाऱ्यांवर गुन्हा

पीककर्ज न वाटल्याने बँक अधिकाऱ्यांवर गुन्हा

Published On: Jun 27 2018 12:13PM | Last Updated: Jun 27 2018 12:13PMउस्मानाबाद  : भीमाशंकर वाघमारे

शेतकऱ्यांना कर्जवाटप न केल्याप्रकरणी कळंब तालुक्यातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या दोन शाखा व्यवस्थापकांवर मंगळवारी ता. २६ रात्री कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. 

याबाबत माहिती अशी की, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 अंतर्गत कर्जमाफी करण्यात आली होती. याचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना तातडीने कर्जवाटप करण्याचे आदेश  जिल्हाधिकारी उस्मानाबाद व उपनिबंधक सहकारी संस्था, पुणे यांनी दिले होते. तरीही या आदेशांचे पालन न केल्याप्रकरणी स्टेट बँक ऑफ इंडिया कळंब या शाखेचे व्यवस्थापक कृष्णकांत मारुती काळे व स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा आंदोरा या शाखेचे व्यवस्थापक महेश आनंद गावकर यांच्यावर कळंब पोलिसात बालाजी शरणाप्पा कटकदोंड सहायक निबंधक सहकारी संस्था कळंब यांनी  दिलेल्या फिर्यादीवरून कळंब पोलिसात कलम 188 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पीक कर्जवाटप न केल्याने थेट बँक अधिकाऱयांवर गुन्हा दाखल होण्याची ही पहिलीच घटना असल्याचा दावा करण्यात येत आहे.