Fri, Jan 18, 2019 06:49होमपेज › Marathwada › घरात वडिलांचा मृतदेह ठेवून दहावीची परीक्षा दिली! 

घरात वडिलांचा मृतदेह ठेवून दहावीची परीक्षा दिली! 

Published On: Mar 15 2018 7:40AM | Last Updated: Mar 15 2018 7:40AMउमरगा: प्रतिनिधी  

सामान्य कुटूंबातील लक्ष्मी दिगंबर दुधभाते हिची दहावीची परीक्षा सुरू असताना मंगळवारी सायंकाळी वडिलांचे निधन झाले. बुधवारी विज्ञानचा पेपर देऊन वडिलांच्या अंत्य संस्काराला जाण्याचे धैर्य तालुक्यातील त्रिकोळी येथील सावित्रीच्या लेकीने दाखवले.

तालुक्यातील त्रिकोळी येथील स्वामी विवेकानंद विद्यालयात दहावीच्या वर्गात शिकणारी लक्ष्मी अभ्यासात हुशार, मात्र कौटुंबिक परिस्थिती हालाकीची आई-वडील, दोन भाऊ असे कुटुंब. शेळ्या मेंढ्या राखून उदरनिर्वाह करणारे दिगंबर दुधभाते यांना वडिलोपार्जित सहा एकर शेतजमीन त्यातून निघालेले उत्पन्न व शेळ्या व्यवसायातून कसेबसे मुलांचे शिक्षण सुरू ठेवले होते. मोठा मुलगा अकरावी, मुलगी लक्ष्मी दहावीला तर लहान मुलगा नववीच्या वर्गात शिक्षण घेत आहे.

दिगंबर दुधभाते यांच्या कष्टाच्या कमाईवरच कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू होता. त्यात तीन महिन्यापूर्वी दोन्ही किडनी निकामी झाल्याने उपचारासाठी विविध ठिकाणी प्रयत्न सुरू होते. मंगळवारी त्यांचे निधन झाले. लक्ष्मीवर दु:खाचा डोंगर कोसळलेला असतानाही बुधवारी सकाळी दहा वाजता शहरातील महात्मा बसवेश्वर विद्यालयातील परीक्षा केंद्रावर उपस्थित राहून दहावीच्या विज्ञान भाग एक विषयाचाचा पेपर सोडवला. परीक्षा संपताच  पानावलेल्या डोळ्यांनी हंबरडा फोडत त्रिकोळी गाव गाठले. दुपारी वडिलांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करून उर्वरित पेपर देण्याचा मानस व्यक्त करून वडिलांचे स्वप्नपूर्ण करणार असल्याचे तिने सांगितले.