Sun, Mar 24, 2019 16:56होमपेज › Marathwada › कपाशी उगवताच अळीचा प्रादुर्भाव

कपाशी उगवताच अळीचा प्रादुर्भाव

Published On: Jun 30 2018 1:18AM | Last Updated: Jun 29 2018 11:37PMगेवराई : विनोद नरसाळे

यावर्षी कपाशीवर सुरुवातीलाच अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. एरवी ही अळी सप्टेंबरनंतर पाहायला मिळते; पण यावर्षी कपाशी उगवून दोन-चार पानांवर येताच अगोदरच ती पिकाला कुरतडत आहे. तसेच कपाशीची पानेदेखील गळून गेली आहेत. परिणामी, शेतकरी हवालदिल झाले असून त्यांना कृषी विभागाकडून मार्गदर्शनाची गरज आहे. काही शेतकर्‍यांनी आतापासूनच फवारणी सुरू केल्याने खर्चही वाढला आहे.

गेवराई तालुक्यात जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाने हजेरी लावली होती. यानंतर मृग नक्षत्रात लागवड केल्यास पिके जोमदार येतात म्हणून शेतकर्‍यांनी कपाशी लागवडीची लगबग केली. तालुक्यातील कोळगाव, शिरसमार्ग, मादळमोही, तांदळा, सुशी, वडगाव, पाडळसिंगी, हिरापूर आदी परिसरांत बहुतांश शेतकर्‍यांनी ठिबक सिंचनावर तसेच पाऊस चांगला पडेल, या आशेवर कपाशी लागवड केली. ही कपाशी आता ताशी लागली असून आंतरमशागतीची कामे सुरू आहेत. मात्र यावर्षी कपाशी उगवून चार-पाच पानांवर कपाशीची पिके असतानाच यावरती अळींचा प्रादुर्भाव असल्याचे निदर्शनास आले आहे. सुरुवातीलाच कपाशीवर रोग पडू लागल्याने शेतकरी राजा हवालदिल झाला आहे.

गतवर्षी कपाशीवर ऑक्टोबर दरम्यान शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर पडला होता. मात्र, यंदा तो सुरुवातीला झाल्याचे दिसून आले. याची कारणे जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता मागील वर्षी सप्टेंबर महिनाअखेरीस पाऊस झाला. त्यामुळे कोरडवाहू शेतकर्‍यांनीही फरदड घेण्याचे प्रमाण वाढवले. शेतकर्‍यांनी कपाशी उपटून शेतात नांगरणी करून जमीन किमान तीन महिने उन्हात तापू देणे आवश्यक होते. मात्र शेतकर्‍यांनी शेतात असलेली कपाशी पावसाळ्याच्या तोंडावर उपटून मेहनतीची लगबग केली होती. यामुळे अळ्यांचे प्रजनन चालूच राहिले. किडींची सतत वाढ होत राहिली. अशातच जूनच्या सुरुवातीला झालेल्या पावसामुळे लवकरच कपाशीची लागवड  झाली. नंतर प्रादुर्भाव होण्यास सुरुवात झाली असून अळीचा लवकरच प्रादुर्भाव दिसून येत असल्याचे कृषी तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. ही अळी नियंत्रित करण्यासाठी कोणती औषधी फवारावी, हाही शेतकर्‍यांना प्रश्‍न आहे.

कृषी विभागाकडून मार्गदर्शनाची गरज 

गेल्या वर्षीही बोंडअळीने कपाशीवर मोठा हल्ला चढविला होता. यामध्ये जिल्ह्यातील तीन लाख हेक्टर कपाशीचे क्षेत्र बाधित झाले होते. बोंडअळीच्या नियंत्रणासाठी शेतकर्‍यांनी तीन हजार रुपये लिटरचे औषधी फवारणी केली होती. या फवारणीचे दोन ते तीन डोस देऊनही बोंडअळी नियंत्रणात आली नाही. यामुळे शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. काही विक्रेते शेतकर्‍यांना महागडी औषधी विक्री करून आर्थिक लूट करतात, असे प्रकार यावर्षी होऊ नये, यासाठी कृषी विभागाच्या तज्ज्ञ अधिकार्‍यांनी गावोगाव जाऊन मार्गदर्शन करण्याची गरज शेतकर्‍यांतून व्यक्‍त केली जात आहे. 

नुकसानीची शेतकर्‍यांना भीती

कपाशीवर सुरुवातीलाच प्रादुर्भाव होत असल्याने शेतकर्‍यांची धाकधूक वाढू लागली आहे. मागील वर्षी कपाशीवर पडलेल्या बोंडअळीने शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यामुळे यावर्षी देखील कपाशीवर बोंडअळीचा धोका आहे.त्यामुळे पर्यायी पिके कोणती घ्यावी, असा शेतकर्‍यांसमोर प्रश्‍न आहे.

बोंडअळीची चर्चा

सुरुवातीलाच अळींचा प्रादुर्भाव दिसून येऊ लागल्याने ही बोंडअळी असल्याचे शेतकर्‍यांतून बोलले जात आहे. या अळीचे नियंत्रण करण्यासाठी काही शेतकर्‍यांनी फवारणीदेखील सुरू केली आहे. यंदा काय फवारावे, अळीचे नियंत्रण होईल की नाही, अशी चिंता शेतकर्‍यांना आताच लागली आहे.