Tue, May 21, 2019 04:35होमपेज › Marathwada › हिंगोली : कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकर्‍याची आत्‍महत्या

हिंगोली : कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकर्‍याची आत्‍महत्या

Published On: Jun 03 2018 4:29PM | Last Updated: Jun 03 2018 4:29PM
सेनगाव : पुढारी ऑनलाईन

राज्यात कर्जबाजारीपणामुळे शेतकर्‍यांचे आत्‍महत्या सत्र सुरूच आहे. हिंगोलीतील सेनगाव तालुक्यात एका ३३ वर्षीय शेतकर्‍याने कर्जबाजारीपणामुळे आत्‍महत्या केल्याची घटना घडली. नारायण बळीराम जाधव असे बोरखडी तांडा येथील या शेतकर्‍याचे नाव आहे. आज, रविवारी सकाळी ११ वाजता नारायण यांनी गळफास घेतला. 

शेतकरी नारायण यांच्याकडे २ एकर कोरडवाहू शेती आहे. त्यांनी स्‍टेट बँक ऑफ इंडियाकडून ५० हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. तसेच घर बांधणीसाठी महिंद्र फायनान्‍सकडून १ लाख रुपयांचे गृहकर्ज घेतले होते.  तर खासगी सावकाराकडून एक लाख रुपये कर्जाऊ घेतले होते. 

सततची नापिकी आणि शेतमालाला योग्य दर मिळत नसल्याने घेतलेले २ लाख ५० हजारांचे कर्ज फेडणे शक्य होत नव्‍हते. त्यात गृहकर्जाची परतफेड करण्यासाठी महिंद्रा फायनान्‍सकडून फोनवरून विचारणा होत होती. तर दुसरीकडे जून महिना सुरू होताच पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे शेतात पेरणीसाठी बी-बियाणे खरेदी करावे लागणार होते. जवळ पैसा नसल्याने नारायण बेचैन होते. त्यातच फायनान्‍सकडून पैशांची मागणी सुरू झाल्याने ते तणावात होते. 

आज, रविवारी (दि.३) सकाळी पत्‍नी कामासाठी शेतात गेली असता नारायण यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्‍महत्या केली. या घटनेनंतर सेनगाव तालुक्यात शेतकर्‍यांतून संतप्‍त प्रतिक्रिया उमटत आहेत.