Sat, Apr 20, 2019 10:02होमपेज › Marathwada › 'मुख्यमंत्री साहेब मी ही कायमचा संपावर जात आहे'

'मुख्यमंत्री साहेब मी ही कायमचा संपावर जात आहे'

Published On: Jun 03 2018 7:18PM | Last Updated: Jun 03 2018 7:18PMशिराढोण : प्रतिनिधी

आजपर्यंत अनेक शेतकरी कायमचे ‘संपा’वर गेले आहेत. शेतकरी, व्यापारी जगतील अशी धोरणे राबवा. मी ही कायमचा संपावर जात आहे, अशा आशयाची चिठ्ठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे लिहून एका शेतकर्‍याने आत्महत्या केली. याप्रकरणी शिराढोण (जि. उस्मानाबाद) पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. 

निपाणी (ता. कळंब, जि. उस्मानाबाद) येथील शेतकरी व आडत व्यापारी दत्तात्रय गुंड यांनी मुख्यमंत्र्यांच्या नावे चिठ्ठी लिहून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. दोन दिवसांनंतर व कायदेशीर सोपस्कर पार पडल्यानंतर शिराढोण पोलिस ठाण्यात शनिवारी सायंकाळी अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. या चिठ्ठीत दत्तात्रय यांनी मुख्यमंत्र्यांना म्हटले आहे, की आणखी किती शेतकरी कायमचे संपावर (आत्महत्या करणार) जाणार याची वाट पाहू नका. निर्णय बदला. शेतकरी, व्यापारी यांना न्याय द्या. त्यांना जगवा. तुम्ही आजपर्यंत केलेल्या कामगिरीबद्दल धन्यवाद. तुम्हाला सर्व शेतकरी, व्यापारी चोरच दिसतात. म्हणून तर या दोन घटकात वाद लावले जात आहेत. व्यापार्‍यांमुळेच आजपर्यंत शेतकरी जिवंत होता. हमीभाव, कर्जमाफी, मोफत बियाणे, शेततळे आदी घोषणांमुळे शेतकरी पूर्णत: कर्जाच्या डोंगरात बुडाले आहेत. त्यातीलच मी एक आहे. सरकारची दुष्काळी धोरणे व दुष्काळाने माझे जीवन संपवले आहे. आणखी वाटू पाहू नका, मुख्यमंत्री साहेब

तपास सुरु : माने

याबाबत आम्ही अकस्मात मृत्युची नोंद केली आहे. दत्तात्रय यांच्याजवळील चिठ्ठीही ताब्यात घेतली आहे. या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी सुरु असल्याचे फौजदार सुभाष माने यांनी सांगितले.