Thu, Jun 27, 2019 13:43होमपेज › Marathwada › शेतकर्‍यांचे मावेजासाठी हेलपाटे

शेतकर्‍यांचे मावेजासाठी हेलपाटे

Published On: Mar 23 2018 1:58AM | Last Updated: Mar 23 2018 12:37AMपरभणी : प्रतिनिधी

गंगाखेड तालुक्यातील चिंचटाकळी शिवारात रस्ता कामासाठी जमिनी संपादित करण्यात आल्या होत्या, परंतु या जमिनींचा असंख्य शेतकर्‍यांना अजून भूसंपादन कार्यालयाकडून मावेजा मिळाला नाही. यासाठी सदरील शेतकरी हे या कार्यालयात चकरा मारत असले तरी अंतर्गत कार्यालयांकडून त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याची तक्रार शेतकर्‍यांनी केली आहे. 

चिंचटाकळी येथील गट क्रमांक 23,25 व 26 मधील शेतकर्‍यांच्या जमिनी आहेत. या गटामधून खळी, चिंचटाकळी, गौडगाव, मैराळ सावंंगी, धारासूर असा रस्ता गेलेला आहे. या रस्त्यासाठी संबंधित गटातील शेतकर्‍यांच्या शेतजमिनी प्रशासनाच्या वतीने संपादित करण्यात आल्या होत्या, पण या संपादित केलेल्या जमिनीचा मावेजा अजूनही या शेतकर्‍यांना देण्यात आला नसल्याची तक्रार शेतकर्‍यांची आहे.  

याबाबत शेतकर्‍यांनी सार्वजनिक बांधकाम विभागात विचारणा केली असता रस्ता आमच्या कार्यक्षेत्रातील नसल्याचे तेथील अधिकारी सांगतात असेही यात नमूद केलेले आहे. तसेच काही जण या रस्ता जमीन संपादनाबाबत संबंधित विभागाला प्रस्ताव पाठवला असल्याचे सांगतात. याप्रकरणी भूसंपादन कार्यालयास विचारणा केल्यास त्याबाबत परिपूर्ण अर्जात माहिती देण्याचे कळविण्यात येते. यापूर्वीचे रस्ता जमीन संपादनाबाबत दस्तावेज सापडत नसल्याची उत्तरे दिली जातात. जिल्हाधिकारी यांना विचारणा केल्यास प्रकरण निकाली काढण्याचे आदेश त्यांच्याकडून देण्यात आलेले आहेत. हा सर्व प्रकार होत असला तरी संपादित जमिनीचा मोबदला अजूनही सदरील शेतकर्‍यांना मिळाला नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ येत आहे. 30 डिसेंबर 2009 पासून आजतागायत शेतकर्‍यांनी या विविध क्षेत्रांतील कार्यालयांना अर्ज दिले, पण याप्रकरणाची कोणत्याही अधिकार्‍यांनी शहानिशा केली नसल्याचे स्पष्ट केले आहे. आतातरी मावेजा मिळेल की नाही याची शाश्‍वती शेतकर्‍यांना राहिली नसल्याने शेतकर्‍यांनी नेमका कोणाकडे न्याय मागायचा असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.