Sun, Nov 18, 2018 04:58होमपेज › Marathwada › कामगंध सापळा ठरतोय बोंडअळीचा कर्दनकाळ 

कामगंध सापळा ठरतोय बोंडअळीचा कर्दनकाळ 

Published On: Jul 28 2018 1:35AM | Last Updated: Jul 28 2018 12:51AMअंबाजोगाई : रवी मठपती

बोंडअळीचा अंबाजोगाई तालुक्यात प्रादुर्भाव सुरू झाला आहे. गतवर्षी बोंडअळीच्या प्रादुर्भावाने कपाशीचे अतोनात नुकसान झाले होते. शेतकर्‍यांना मोठ्या नुकसानीस सामोरे जावे लागले होते. कपाशीवरील बोंडअळीचा प्रादुर्भाव व प्रजनन रोखण्यासाठी कामगन्ध सापळे अत्यंत प्रभावी ठरत असून हा सापळा बोंडअळीचा कर्दनकाळ ठरतो आहे, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी श्रीखंडे व कृषी सहायक पंडित काकडे यांनी दिली. बोंडअळीच्या प्रादुर्भावास व प्रजननास लगाम घालण्यासाठी तालुका कृषी कार्यालयाने पुढाकार घेतला आहे. 

पहिल्या पावसानंतर गुलाबी बोंडअळीचे पतंग कोषामधून बाहेर पडले आहेत. गुलाबी बोंडअळीचे जीवनचक्र सुरू झाले आहे. नर पतंग सापळ्यातील कामगन्धामुळे सापळ्यात अडकत असल्याचे दिसून येत आहेत. कापसामध्ये सर्व शेतकरी बांधवांनी कामगंध सापळे लावल्यास गावामध्ये नर पतंगाची मास ट्रॅपिंग करून किडीची संख्या कमी करता येईल. फुलोरा अवस्था येण्यापूर्वी हे पतंग कामगंध सापळ्यात पकडून मारल्यास त्याचे प्रजनन कमी हाऊन किडींच्या संख्यावर काही प्रमाणात मात करता येइल व फुलोरा, पाते अवस्थेत गुलाबी बोंडआळीचा प्रादुर्भाव कमी करता येईल.  फुलोरा, पाते अवस्थेत गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव कमी असल्यास पुढे प्रादुर्भाव कमी राहतो. 

कामगंध सापळ्याचा वापर

कामगंध सापळ्याची किंमत 40 ते  60 रुपये आहे. एकरी 8 सापळे पिकापेक्षा 1 फूट उंचीवर लावावेत.  दर 60 दिवसांनी सापळ्यतील ल्यूर  बदलणे आवश्यक. सतत 3 दिवस 8 पतंग सापळ्यात आढळल्यास आर्थिक नुकसानाची पातळी ओलांडली असे समजून 35-45 व्या दिवशी पाते फुले अवस्थेत 5टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी.

स अंबाजोगाई  तालुक्यात सेंद्रीय बोंडअळीचा पतंग कामगंध सापळ्यामध्ये आढळला आहे. त्यामुळे कापूस लागवड केलेल्या शेतकर्‍यांनी प्रतिएकरी 5 या प्रमाणे आपल्या  कापसाच्या शेतांमध्ये सेंद्रीय बोंडअळीचा लूर असलेले कामगंध सापळे लावावे  तसेच शेतकर्‍यांनी  घाबरू नये. कृषी विभागाचा सल्ला  घ्यावा. आर्थिक नुकसान पातळीच्यावर कीड गेल्यावरच तज्ञाच्या सल्ल्यानुसार कीटकनाशकाची फवारणी  करावी,  असे  आवाहन वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणीचे  शास्त्रज्ञ गुट्टे  व तालुका कृषी अधिकारी  गणेश श्रीखंडे यांनी  केले आहे.