Wed, Apr 24, 2019 11:30होमपेज › Marathwada › तीन महिन्यांपासून जोपासलेल्या टमाट्याचा झाला क्षणात चिखल

तीन महिन्यांपासून जोपासलेल्या टमाट्याचा झाला क्षणात चिखल

Published On: Feb 13 2018 2:41AM | Last Updated: Feb 13 2018 2:36AMगेवराई : विनोद नरसाळे

तीन महिन्यांपूर्वी एका एकरात टमाटे व पंधरा गुंठ्यात वांगे लागवड केली, यानंतर वेळोवेळी त्याची मेहनत करून तळहाताच्या फोडाप्रमाणे आम्ही कुटुंबाने काळजी घेतली. यासाठी जवळपास एक लाख खर्च केला होता. दरम्यान रोपट्यांना टमाटे, वांगे चांगली लगडली असताना व तोंडाशी घास आला होता, मात्र रविवारी सकाळी झालेल्या अवकाळी पाऊस तसेच गारपीट यामुळे हा तोंडाशी आलेला घास अचानक कोसळलेल्या अस्मानी संकटाने हिरावून नेला. काही क्षणात होत्याचे नव्हते झाले ही आपबिती पाणावलेली डोळे भरून नवनाथ शेंबडे यांनी सांगितली. अचानक आलेल्या गारपिटीमुळे शेंबडे यांचे तब्बल साडेतीन लाखांचे नुकसान झाले आहे.

गेवराई तालुक्यातील नवनाथ शेंबडे यांना पावणेतीन एकर जमीन आहे. दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील शेतात कापूस लागवड त्यांनी केली. मात्र कपाशीवर बोंडअळी पडल्याने मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे उसणवारी करत बी-बियाणांपासून केलेला खर्च परत द्यायचा कसा हा मोठा प्रश्‍न शेंबडे यांच्यापुढे होता. दरम्यान ही कपाशी उपटून याठिकाणी दुसरे पीक घेण्याचा निश्‍चय करून त्यांनी एक एकरमध्ये टमाटे व 15 गुंठ्यात वांगे लागवड केली. टमाटे व वांगे चांगली येऊन एका झाडाला जवळपास पंधरा किलो टमाटे लगडली होती. 

दरम्यान तोडणीसाठी आलेले टमाटे व वांग्यांना बाजारात चांगला भाव असल्याने त्यांना यामधून साडेतीन लाखांचे उत्पादनाची आशा होती. त्यामुळे कपाशी व टमाटे, वांगे शेतीसाठी घेतलेले उसणवारी पैसे मिटले जातील. 

डोक्यावर झालेले कर्ज फिटेल अशी आशा नवनाथ शेंबडे यांना असतानाच रविवारी सकाळी तालुक्यातील अनेक गावांसह शेकटा येथेही कधी नव्हे एवढ्या मोठ्या प्रमाणात गारपीट होऊन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामध्ये नवनाथ शेंबडे यांचे टमाटे शेतीचा अक्षरशः चिखल झाला तर वांगे देखील जमीनदोस्त झाली. त्यामुळे शेतकर्‍यांवर नेहमीच अस्मानी संकटे कोसळत असताना शेतकरी देखील कर्जाच्या ओझ्याखाली दबत असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.