Mon, May 20, 2019 10:54होमपेज › Marathwada › हॅलो, मी बडोदा बँकेतून बोलतोय 

हॅलो, मी बडोदा बँकेतून बोलतोय 

Published On: Jul 29 2018 1:23AM | Last Updated: Jul 29 2018 1:16AMअंबाजोगाई  : प्रतिनिधी 

‘हॅलो,  मी बँक ऑफ बडोदा मधून बोलतोय, तत्काळ बँकेत या, तुमचे पीक कर्ज माफ झाले आहे’ असा फोन तालुक्यातील जवळगाव येथील  महिला शेतकरी संजीवनी विठ्ठल भुरे यांना आला, आणि खरोखरच पाच महिन्यांपासून रखडलेली दीड लाख रुपयांची कर्ज माफी मिळाली व नवे पीक कर्ज मंजूर झाले.

‘पीक कर्जासाठी बँकेत चकरा’ या मथळ्याखाली दै. पुढारीमधून दि.16 जुलै रोजी तालुक्यातील जवळगाव येथील महिला शेतकरी संजीवनी विठ्ठल भुरे यांची होत नसलेली दीड लाख रुपये कर्ज माफी व मिळत नसलेले नवीन पीक कर्ज, याबद्दलची व्यथा मांडली होती.  

तालुक्यातील जवळगाव येथील महीला शेतकरी संजीवणी विठ्ठल भुरे यांनी बँक ऑफ बडोदा अंबाजोगाई शाखेतून पीक कर्ज घेतले होते.  घेतलेल्या पीक कर्जापैकी दीड लाख रुपये सरकारने माफ केले आहेत, उर्वरित रक्कम भरा नवीन कर्ज देतोत असे बँकेने त्यांना  सांगितले. त्यानुसार भुरे यांनी उर्वरित दोन लाख नव्वद हजार रुपये उसनवारी करून 22 मार्च रोजी भरणा केले.  त्यानंतर नवीन पीक कर्ज घेण्यासाठी गेल्यावर सरकारकडून तुमचे कर्ज माफ करण्यात आले नाही, असे सांगून पीक कर्ज देण्यास टाळाटाळ केली जात होती. 

याबाबतचे वृत्त दै. पुढारीमधून दि.16 जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आले. याची दखल जिल्हाधिकारी कार्यालयाकडून व बीड येथील अग्रणी बँक अधिकारी यांच्याकडून गांभीर्याने घेण्यात आली. तेथून विचारणा होताच अंबाजोगाई येथील संबंधीत बँकेचे अधिकारी खडबडून जागे झाले. 

त्यानंतर बँकेने महिला शेतकरी संजीवनी भुरे यांना थेट बँकेत बोलावून घेतले. दीड लाख रुपये कर्ज माफ झाल्याचे सांगितले तसेच नव्याने 99 हजार रुपये पीक कर्ज देण्यात आल्याचे संजीवनी यांचे पती विठ्ठल भुरे यांनी सांगितले. महिला शेतकरी संजीवनी विठ्ठल भुरे यांनी दै. पुढारीचे आभार व्यक्त केले आहेत.