Sat, Jan 19, 2019 07:33होमपेज › Marathwada › खरबूज शेतीतून लाखाचे उत्पादन 

खरबूज शेतीतून लाखाचे उत्पादन 

Published On: Apr 30 2018 1:44AM | Last Updated: Apr 30 2018 12:43AMअंबाजोगाई :  रवी मठपती 

तालुक्यातील गडदेवाडीच्या विठ्ठल भागुराम गडदे नावाच्या शेतकर्‍याने बाला घाटातील कामठ नावाच्या उजाड डोंगराच्या माथ्यावर बागायत  शेती फुलवून  खरबुजाच्या शेतीतून लाखाचे उत्पन्न घेतले आहे.व्यापार्‍याच्या नादाला न लागता  स्वतः खरबुजाची विक्री केल्याने अधिक फायदा झाल्याचे विठ्ठल गडदे यांनी सांगितले.

अंबाजोगाई व परळी तालुक्याच्या डोंगर सीमेवर गडदेवाडी शिवार आहे. याठिकाणी विठ्ठल गडदे यांची डोंगरात बारा एकर शेती आहे. पारंपारिक पद्धतीने शेतीतून बाहेर पडण्याचा निर्णय गडदे यांनी घेतला.प्रायोगिक तत्त्वावर हिंमत धरून एक एकरमध्ये निर्मल 225 वाणाचे खरबूज बियाण्याची सव्वा फूट बाय पाच फूट अंतरावर लागवड केली. त्यापूर्वी मशागत करून व शेणखत टाकून बेड तयार करण्यात आले. जानेवारी अखेरीस मल्चिंग पेपर अंथरून खरबूज बियाणे लावण्यात आले. पाणी व्यवस्थापणासाठी विहीर आहे. ठिबक सिंचनद्वारे पिकासाठी पाणीपुरवठा करण्यात आला. 

खरबूज  पीक सत्तर ते ऐंशी दिवसांत काढणीस येते. गडदे यांनी एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पोसलेले व पक्व झालेले खरबूज व्यापार्‍यास न देता थेट अंबाजोगाई शहर गाठले. स्वतः चौकात उभारून खरबूज विक्रीसाठी उपलब्ध केले. मित्र आप्पासाहेब गडदे, श्रीराम गडदे यांनी वेळोवेळी मदत केली. पंचवीस ते तीस रुपये प्रती किलो प्रमाणे पाच टन खरबुजाची विक्री केली.

एकूण विक्रीतून एक लाख रुपये मिळाले त्यातील पन्नास हजार रुपये लागवडीसाठी व इतर खर्च झाला. सत्तर दिवसांत विठ्ठल गडदे यांना पन्नास हजार रुपये फायदा झाला. महत्वाचे म्हणजे मिळालेल्या उत्पन्नातून मित्रांकडून घेतलेले हातउसने पैसे परतफेड केले. विशेष म्हणजे शेतकरी विठ्ठल गडदे यांनी मित्र, नातेवाईक, शेजारी या सर्वांना खरबुजं खाण्यासाठी शेतात आमंत्रणे दिली. इच्छाशक्ती असेल तर मार्ग निघतो, हेच त्यांनी यातून दाखवले आहे.