Fri, May 24, 2019 06:57होमपेज › Marathwada › खरीप हंगामासाठी शेतकर्‍यांची धावपळ

खरीप हंगामासाठी शेतकर्‍यांची धावपळ

Published On: Jun 05 2018 1:17AM | Last Updated: Jun 04 2018 11:43PMजिंतूर : प्रतिनिधी

दोन दिवसांपासून हवामानात बदल होऊन पावसाळी वातावरण निर्माण होत आहे. खरीप हंगामातील पीक लागवडीसाठी शेतीची औजारे, बी-बियाणे, खत व इतर साहित्याची जमवाजमव करण्यासाठी तालुक्यातील शेतकर्‍यांची धावपळ सुरू झाली आहे. 

एप्रिल- मे महिन्यातील लग्नसराई, पीक लागवडीपूर्व शेती मशागतीच्या उन्हाळी कामातून नुकताच शेतकरी विसावला होता. यावर्षीच्या मे हिटमुळे जमिनीची धूपही चांगली झाली. त्यामुळे शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत असताना बदललेल्या वातावरणामुळे लागवडीयोग्य पाऊस कधी पडेल याचा भरवसा नसल्याने ऐनवेळी तारांबळ होऊ नये यासाठी बळीराजा पूर्व तयारीला लागला असून पीक कर्जाच्या मागणीसाठी बँकांचे उंबरठे झिजवत आहे. बँकांनी कर्ज देण्यास टाळाटाळ केल्यास असमर्थता दर्शविल्यास सावकाराची विनवणी करतानाचे चित्र शहरासह ग्रामीण भागातून दिसत येत आहे. प्रसंगी विक्रेत्यांकडे बियाणे, खत, औषधी उधारीवर देण्याची मागणी करत आहे.दरम्यान कृषी विभागाची शेतकर्‍यांच्या बांधावर  ही संकल्पना वार्‍यावरच असल्याने तसेच तालुका कृषी कार्यालयाकडून माती परीक्षणाबाबत योग्य मार्गदर्शन होत नसल्यामुळे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी जमिनीच्या आरोग्यानुसार कोणत्या वाणाची बियाणे खरेदी करावी या संभ्रमात शेतकरी दिसत आहेत. अनेक अनुभवी शेतकरी घरगुती ठेवलेले बियाणे वापराच्या तयारीत असून त्यांची साफसफाई करत आहेत.