होमपेज › Marathwada › ना आईचे दूध, ना मातेच्या प्रेमाची ऊब...

ना आईचे दूध, ना मातेच्या प्रेमाची ऊब...

Published On: Jun 04 2018 8:58AM | Last Updated: Jun 04 2018 8:58AMबीड : प्रतिनिधी

येथील जिल्हा रुग्णालयात जन्मलेल्या चिमुकलीचे व तिच्या आईचे डीएनए रिपोर्ट जुळूनही ती चिमुकली आपली नसल्याचा संशय निर्माण झाल्याने आपण ही मुलगी सांभाळण्यासाठी समर्थ नाही, असा अर्ज थिटे दाम्पत्याने बीड जिल्हा महिला आणि बालकल्याण समितीकडे शनिवारी दिला. समितीने दाम्पत्याचं समुपदेशनही केले, मात्र काहीही उपयोग झाला नाही.  अखेर त्या चिमुकलीची रवानगी औरंगाबादच्या शिशुगृहात करण्यात आली

आहे. ना आईचं दूध मिळाले, ना मातेच्या प्रेमाची ऊब मिळाली. बीड-औरंगाबाद असा प्रवास या चिमुकलीचा सुरू आहे. बीड जिल्ह्यातील वडवणीतील थिटे दाम्पत्याचा आरोप होता, की आपल्याला मुलगा जन्माला आला, मात्र हाती मुलगी देण्यात आली. 11 मे रोजी या बाळाने बीडच्या जिल्हा रुग्णालयात जन्म घेतला. त्या नंतर चार-पाच दिवस या बाळावर उपचार झाले. नंतर मात्र या बाळाला बीडच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. त्या खासगी रुग्णालयात मात्र ही मुलगी असल्याची नोंद डॉक्टरांनी केली आणि मुलीच्या आई-वडिलांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. कारण, जिल्हा रुग्णालयाच्या नोंदीमध्ये या बाळाची नोंद मुलगा अशी करण्यात आली होती. पोलिसांत तक्रार केल्यानंतर हे दाम्पत्य ही मुलगी आमची नाहीच, यावर ठाम होते. त्या नंतर आईने चिमुकलीला दूध पाजणे बंद केले होते. चिमुकलीला झालेले इंफेक्शन वाढत होते, म्हणून तिला औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात हलवण्यात आले. तर दुसर्‍या बाजुला पोलिस या सर्व प्रकरणाचा तपास कसून करत होते. त्यासाठी डीएनए घेण्यात आले आणि तब्बल 19 दिवसांनंतर ही मुलगी राजू आणि छाया थिटे यांचीच असल्याचे डीएनए अहवालात उघड झाले.

पहिल्या दिवशीच आला होता अंदाज
डीएनए रिपोर्ट आल्यानंतर त्या मुलीच्या आई-वडिलांनी तत्काळ बीड पोलिसांशी संपर्क साधून बाळ ताब्यात घेणे अपेक्षित होते, मात्र तिचे आई-वडिल एक दिवस उशीरा पोलिस ठाण्यात पोहोचले. अखेर बीड पोलिसांनी या आई-वडिलांना सोबत घेऊन घाटी रुग्णालय गाठले आणि रितसर या मुलीचा ताबा आई-वडिलांना देण्यात आला. या बाळाचे इंफेक्शन कमी झाले नसल्याने घाटी रुग्णालयात उपचार करण्यात आले. येथून पुढचा या मुलीचा ताबा तिच्या आई-वडिलांकडे देण्याचे सोपस्कार पोलिसांनी रुग्णालयातच पार पाडले, मात्र डीएनए चाचणी मान्य नसल्याचे सांगत आपण या मुलीला सांभाळण्यासाठी असमर्थ आहोत, असा अर्ज या दाम्पत्याने केला. रुग्णालयाची चूक झाल्यामुळे जन्मापासूनच या मुलीवर संघर्षाची वेळ आली आहे. पुन्हा एकदा तान्हुलीला औरंगाबादला नेण्यात आले आहे.