Tue, Jul 16, 2019 22:35होमपेज › Marathwada › २० कोटींच्या धनादेशाने अधिकाऱ्यांना फोडला घाम

२० कोटींच्या धनादेशाने अधिकाऱ्यांना फोडला घाम

Published On: Dec 17 2017 7:38AM | Last Updated: Dec 17 2017 11:34AM

बुकमार्क करा

उस्मानाबाद : प्रतिनिधी

धनादेश दिला जातो एका मल्टीस्टेट क्रेडीट सोसायटीच्या सीईओकडून... आयसीआयसीआय बँक ती रक्‍कम या संस्थेच्या खात्यावर वर्गही करते... ती असते 20 कोटींची... पैकी 4 कोटी उचलले जातात... नंतर बँकेच्या वरिष्ठ कार्यालयकडून हा धनादेश बनावट असल्याचा निरोप येतो नि सुरु होते धावपळ...! चक्रावून टाकणार्‍या व गूढ चित्रपट कथेला साजेशा घटनेचा आव्हानात्मक तपास पोलिस करु लागले आहेत. तपासातून काय काय समोर येते हे पाहणे रंजक असणार आहे.

पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी सांगितलेले हे प्रकरण थोडक्यात असे : येथील फुलाई मल्टीस्टे को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे सीईओ प्रदीप खामकर यांनी हबर्ल लाईन इंटरनॅशनल इंडिया प्रा. लि. या कंपनीचा 20 कोटींचा धनादेश (क्र. 11009265) आयसीआयसीआय बँकेच्या उस्मानाबाद शाखेत जमा केला. त्यानंतर लागतलीच यातील २० कोटींची रक्‍कम ‘फुलाई’ने ग्राहकाला वितरीतही केली. शिवाय एक कोटींची रक्‍कम ‘फुलाई’ने त्यांच्याच अ‍ॅक्सिस बँकेतील खात्यात वर्ग केली. त्याचदिवशी सायंकाळी आयसीआयसीआय बँकेच्या बंगळुरु येथील अधिकार्‍यांनी २० कोटींचा धनादेश बनावट असल्याचे रात्री सातला कळविले.

त्यानंतर बँक अधिकार्‍यांचे धाबे दणाणले. पुढे हालचाली गतिमान झाल्या. बँकेने लागलीच ‘फुलाई’चे खाते गोठविले. सीईओ खामकर यांना बोलावून कल्पना दिली. त्यांनीही 4 कोटी बीड येथील ग्राहकास वितरीत केल्याचे सांगितले. त्यानंतर बँक अधिकार्‍यांनी तातडीने बीड गाठून ते 4 कोटीही परत मिळविले. या रकमेचे भरलेले पोते घेऊन हे पथक सात डिसेंबरला पहाटे चारला शहरात पोचले. दुसर्‍या दिवशी हे चार कोटी ‘फुलाई’च्या खात्यात जमा केले. अ‍ॅक्सिस बँकेकडुनही एक कोटी रिव्हर्स घेतले. व 20 कोटींची रक्‍कम हर्बल लाईफच्या खात्यात वर्ग केली. 

ही झाली घटना. यात कोणाचे नुकसान झाले ना कोणाचा फायदा; पण फसवणुकीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे पोलिसांनीही हे प्रकरण दाखल करुन तपास सुरु केला आहे. बनावट धनादेश उत्पन्‍न कुठून झाला, करते करविते कोण आहेत याचा सखोल तपास सुरु आहे. अधीक्षक देशमुख व उपअधीक्षक अंजुम शेख यांनी आत्तापर्यंत सहा जणांना अटक केलीय. आणखी तिघे संशयित असल्याचा त्यांचा अंदाज आहे. ‘फुलाई’चा चेअरमन मारुती खामकर, सीईओ प्रदीप खामकर या दोघांसह बीड येथील सय्यद फरहान, नरेश राठोड, धीरज कोळी यांना व चार कोटी उचललेला ग्राहक वैभव कोटे (घाटनांदूर, जि. बीड) यांना अटक केली आहे.