होमपेज › Marathwada › पांगरा शिंदे परिसर पुन्हा हादरला, प्रशासनाविरुद्ध ग्रामस्थांचा रोष

पांगरा शिंदे परिसर पुन्हा हादरला, प्रशासनाविरुद्ध ग्रामस्थांचा रोष

Published On: Jan 28 2018 1:33AM | Last Updated: Jan 28 2018 12:08AMवसमत : प्रतिनिधी

तालुक्यातील पांगरा शिंदे गावासह परिसरात भूकंपसदृश्य धक्के सुरूच आहेत. शनिवारी (दि.27) सकाळच्या सुमारास दोन वेळेस मोठे धक्के बसलेे. प्रशासन तीन ते चार महिन्यांपासून नुसते पंचनामे करून अहवाल पाठवित आहे, मात्र अद्यापही या भागात तज्ज्ञांनी भेट देऊन पाहणी केली नसल्याने प्रशासनाविरुद्ध ग्रामस्थांतून रोष व्यक्‍त होत आहे.

तालुक्यातील पांगरा शिंदेसह औंढा नागनाथ, कळमनुरी तालुक्यातील गावांत गत तीन ते चार महिन्यांपासून भूगर्भातून आवाज येत जमीन हादरत आहे. लातूर येथील भूकंप वेधशाळेत दोन ते तीन वेळा भूकंपाची नोंदही झाली आहे. 

दोन महिन्यांपूर्वी नांदेड येथील एसआरटीच्या टीमने पांगरा शिंदे गावास भेट देऊन पाणी, माती नमुने तपासणीस नेले होते. पांगरा शिंदे गाव व परिसरास अधूनमधून भूगर्भात आवाज येत जमीन हादरत असल्याचे प्रकार ग्रामस्थांना आता नित्याचेच झाले आहेत. त्यात शनिवारी सकाळी 8 वाजता व 11.35 वाजेच्या दरम्यान जमीन हादरली. हा धक्का आंबा चौंढीपर्यंत जाणवला. भूकंपाची माहिती नेहमीच ग्रामस्थ प्रशासनास देतात, मात्र या वेळी ग्रामस्थांनी प्रशासनास या हादर्‍यांची माहिती दिली नसल्याची माहिती समोर आली आहे. प्रशासन पांगरा शिंदे व परिसरातील गावांसंदर्भात योग्य भूमिका घेत नसल्याने ग्रामस्थांनी रोष व्यक्त केला आहे.

निसर्गाला कोण रोखू शकतो?
भूगर्भातून आवाज येत भूकंपाचे धक्के जाणवणे हा प्रकार नेहमीचा झाला आहे. निसर्गाला कोण रोखू शकतो. तहसील विभागाचे पथक पांगरा शिंदे गावात पाठवले आहे. भूकंपासंबंधी पूर्ण माहिती जिल्हाधिकार्‍यांना दिली असून प्रशासन काम करीत आहे.
-ज्योती पवार  (तहसीलदार, वसमत)

भूकंप झाल्यानंतर प्रशासन नुसतेच पंचनामे करीत आहे. गत तीन ते चार महिन्यांपासून गावात भूकंपाचे धक्के बसत आहेत, मात्र अद्यापही प्रशासनाने योग्य दखल घेतली नाही. त्यामुळे ग्रामस्थ भयभीत जीवन जगत आहेत. शनिवारी झालेल्या हादर्‍यांची माहिती प्रशासनास कळवली नाही.
-भागवत शिंदे (सरपंच, पांगरा शिंदे)