Wed, May 22, 2019 06:41होमपेज › Marathwada › कोणत्या जावयाला मिळणार गर्दभ सवारीचा मान

कोणत्या जावयाला मिळणार गर्दभ सवारीचा मान

Published On: Mar 01 2018 1:34AM | Last Updated: Feb 28 2018 11:24PMकेज  : प्रतिनिधी

तालुक्यातील विडा या गावात दरवर्षी जावयाची गाढवावरून मिरवणूक काढण्याची परंपरा आहे. धूलिवंदनाचा सण अवघ्या एक दिवसावर येऊन ठेपला असल्याने यावर्षीचा गदर्भ सवारीचा मान कोणत्या जावयास मिळणार याची उत्कंठा वाढली आहे. केज तालुक्यातील विडा येथील आनंदराव ठाकूर यांनी ऐंशी वर्षांपूर्वी धूलिवंदनाच्या दिवशी स्वःताच्या जावयाची गाढवावरून काढलेली मिरवणूक ही विडा गावाची परंपरा बनली. दरवर्षी विड्यात जावायची गाढवावरून मिरवणूक काढण्यात येते. धूलिवंदनाच्या दिवशी गावकरी एका जावयाला पकडून ग्रामपंचायतीच्या कार्यालयात आणतात. त्याला  गाढवावर बसवतात गाढवाच्या गळ्यात चपलांचा हार घालून सजवले जाते. 

जावायाची गाढवावरून ढोल ताशांच्या गजरात रंगांची उधळण करत गावभर मिरवणूक काढली जाते. मिरवणुकीत गावातील आबालवृद्धांसह  परिसरातील गावातील नागरिक सहभागी होतात. जावयाची गाढवावरची मिरवणूक हनुमान मंदिरा जवळ आल्यावर मिरवणुकीचा शेवट करताना ग्रामस्थांच्या वतीने जावयास कपड्यांचा आहेर केला जातो. गदर्भ सवारी करणार्‍या जावयाला त्यांच्या सासरवाडीच्या मंडळी कडून ऐपती प्रमाणे आहेर करत सोन्याची अंगठी देखील काहीवेळ भेट दिली जाते. गावातील या आगळ्या वेगळ्या निजामकालीन परंपरेत गावकर्‍यांनी आजवर शेकडो जावयांना सन्मानित केले आहे.