Fri, Apr 26, 2019 17:21होमपेज › Marathwada › विस्थापित शिक्षकांचा टाहो

विस्थापित शिक्षकांचा टाहो

Published On: May 30 2018 2:19AM | Last Updated: May 29 2018 9:07PMहिंगोली : प्रतिनिधी

जिल्हा परिषदेच्या वतीने सोमवारी (दि.28) जिल्ह्यातील तब्बल 1452 शिक्षकांच्या बदल्यांचे आदेश देण्यात आले होते. या बदल्यांत अनियमितता झाल्याचा आरोप विस्थापित शिक्षकांनी केला आहे. 370 विस्थापित शिक्षकांनी मंगळवारी (दि.29)थेट जिल्हा परिषदेचे अतिरिक्‍त मुख्य कार्यकारी अधिकारी देशमुख यांची भेट घेऊन बदल्यांमध्ये झालेल्या अनियमिततेची समस्या सोडवून न्याय देण्याची मागणी केल्याने शिक्षकांच्या बदल्या वादात सापडल्या आहेत.

शिक्षकाच्या शिष्टमंडळाने जिल्हा परिषदेचे अतिरिक्‍त मुख्य कार्यकारी अधिकारी ए.एम.देशमुख यांची भेट घेऊन आपले गार्‍हाणे मांडले. तसेच प्रशासनास निवेदन दिले. जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रियेमध्ये जिल्ह्यामधून विस्थापित झालेल्या 370 शिक्षकांना जिल्ह्यातील विशेष शिक्षक व निव्वळ रिक्‍त पदाच्या उपलब्ध जागा पोर्टलमधून भरण्याची परवानगी द्यावी व रॅन्डम राउंड सुरू होण्यापूर्वी 20 गावांचा पसंतीक्रम देण्यासाठी विस्थापितांना निव्वळ रिक्‍त पदाची यादी व विषय शिक्षकांच्या रिक्‍तपदाची यादी उपलब्ध करून देण्यात यावी. 27 फेब्रुवारी 2017 च्या शासन निर्णयाप्रमाणे अवघड क्षेत्र निश्‍चितीनंतर प्रत्यक्ष बदली कार्यवाहीपूर्वी किमान एक महिना अगोदर समानीकरणाने रिक्‍त ठेवायच्या जागा घोषित करणे आवश्यक होते, परंतु जिल्हा परिषदेने अधिकृतरीत्या या जागा घोषित केल्या नाहीत.

ऑनलाइन प्रक्रिया सुरू झाल्यानंतर संवर्ग 4 चे ऑनलाइन पसंतीक्रम देण्याची मुदत संपण्याच्या कालावधीच्या दोन दिवस अगोदर  याद्या जाहीर केल्या. परंतु अधिकृत प्रसिद्ध केल्या नाहीत.  गावे निवडताना गोंधळ निर्माण होवून अधिकत्तम शिक्षक विस्थापित झाले आहे. यामध्ये 370 पैकी एकत्रित असलेल्या शिक्षक पती-पत्नी मधून 170 महिला शिक्षिका विस्थापित होऊन त्यांची प्रचंड गैरसोय होणार आहे. यासह इतर मागण्या शिक्षक शिष्टमंडळाने जिल्हा परिषदेकडे केल्या आहेत. गैरसोयीमुळे निर्माण झालेल्या समस्या सोडवून अधिकृतरीत्या जाहीर प्रगटन देऊन शिक्षकांवर अन्याय होणार नाही याची दक्षता घेेण्याची आग्रही मागणी करण्यात आली. निवेदनावर विस्थापित झालेल्या शिक्षक, मुख्याध्यापक व विषय शिक्षकांच्या स्वाक्षर्‍या आहेत. बदली प्रकरणावरून शिक्षक आक्रमक झाले आहे.