Thu, Aug 22, 2019 10:13होमपेज › Marathwada › गारपीटग्रस्‍तांना जाहीर केलेली मदत तुटपुंजी : धनंजय मुंडे 

गारपीटग्रस्‍तांना जाहीर केलेली मदत तुटपुंजी : धनंजय मुंडे 

Published On: Feb 14 2018 8:43PM | Last Updated: Feb 14 2018 8:43PMबीड : प्रतिनिधी

मराठवाडा आणि विदर्भात गारपीट आणि वादळी वार्‍याने शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानी पोटी राज्य सरकारने एन.डी.आर.एफ. च्या निकषाप्रमाणे जाहीर केलेली मदत अतिशय तुटपुंजी आहे. शासनाने 2014 प्रमाणे विशेष पॅकेज देऊन कोरडवाहुसाठी हेक्टरी 25 हजार, बागायतीसाठी 40 हजार, तर फळबागांसाठी 50 हजार रूपयांची मदत करण्याची मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना. धनंजय मुंडे यांनी केली आहे. त्यासोबतच वीज बील माफ कर्जावरील व्याज माफ करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

तीन दिवसांपूर्वी मराठवाडा व विदर्भात झालेल्या गारपीट, वादळी वारे व अवकाळी पावसामुळे मराठवाडा व विदर्भातील सुमारे 2 लाख हेक्टरवरील पीके, फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानीची मुंडे यांनी आज काही ठिकाणी जाऊन पाहणी केली. आज  दुपारी कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना एन.डी.आर.एफ.च्या निकषाप्रमाणे मदत देण्याचे जाहीर केले. मात्र या मदतीला धनंजय मुंडे यांनी तिव्र आक्षेप घेतला आहे. 2014 मध्ये शेतकर्‍यांवर अशाच प्रकारचे संकट आले होते. तेव्हाच्या आघाडी सरकारने शेतकर्‍यांना प्रचलित मदतीसोबतच विशेष पॅकेज दिले होते. त्याच धर्तीवर सरकारने आपतीग्रस्त शेतकर्‍यांसाठी विशेष पॅकेजची घोषणा करावी. 2014 मध्ये  200 कोटी रूपयांचे लाईट बील माफ केले होते. जवळपास 265 कोटी रूपयांचे कर्जावरील व्याज माफ केले होते, पिक कर्ज वसुलीस मुदतवाढ व सक्तीने कर्जवसुली करू नये असे आदेश दिले होते. याची आठवण करून देतानाच त्यावेळचा 20 मार्च 2014 चा शासन निर्णयही ट्विट करून शासनाच्या निदर्शनास अणून दिला आहे. 

यावेळेसचे नुकसानही 2014 प्रमाणे अतिशय मोठे असल्याने सरकारने एन.डी.आर.एफ.चे निकष अधिक पॅकेजमधील रक्कम मिळून कोरडवाहुसाठी हेक्टरी 25 हजार, बागायतीसाठी 40 हजार, तर फळबागांसाठी 50 हजार रूपयांची मदत द्यावी, वीज बील माफ करावे, शेती कर्जाचे व्याज माफ करावे, पिक कर्ज वसुलीस स्थगिती द्यावी अशी मागणी त्‍यांनी केली आहे.