Mon, Mar 25, 2019 13:48होमपेज › Marathwada › कपाशीच्या शेतजमिनीत ‘पीकपालट’ करावी लागणार

कपाशीच्या शेतजमिनीत ‘पीकपालट’ करावी लागणार

Published On: Jun 09 2018 1:35AM | Last Updated: Jun 09 2018 12:07AMशिरूर : जालिंदर नन्नवरे 

गत हंगामात पुसटशीही कल्पना नसणार्‍या गुलाबी बोंडअळीने शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले मात्र गेल्या हंगामातील ज्या शेतजमिनीवर कपाशीचा पेरा करण्यात आला त्या शेतकर्‍यांनी या हंगामात ती कपाशीची जागा बदलविण्याची गरज निर्माण झाली आहे. त्याच जागेवर कपाशीचा पेरा केल्यास या वर्षालाही बोंड अळीचा आक्रस्ताळेपणा कायम राहण्याची संभाव्य शक्यता असल्याने शेतकर्‍यांनी सावध व्हावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

गेल्या हंगामात गुलाबी बोंडअळीने हाती आलेले कपाशीचे पीक ऐन वेळेवर नेस्तनाबूत करून टाकले. देशाची आर्थिक स्थिती ज्याच्या भरवशावर आहे त्या कृषिप्रधान देशाच्या बळीराजाचे आर्थिक नियोजन पार कोलमडले. त्यामुळे नानाविध विवंचनेच्या चक्रव्यूहात अडकलेल्या बळीराजास आर्थिक संकटातून बाहेर पडणे अलीकडेच दुरापास्त होत आहे. नको त्या अवस्था झालेल्या पांढर्‍या सोन्याला कवडीमोल भाव देऊन मायबाप सरकारने थट्टाच केल्याचे वास्तव आहे. 

दरम्यान तूर, हरभरा सारख्या शेतीपयोगी माला पाठोपाठ गव्हाचे पीकही गारपिटीने फस्त केले. एकाहून एक संकट पेलत असताना बळीराजाचा जगण्याचा  प्रश्‍न ऐरणीवर येत आहे. कपाशीचे उत्पादन हातून गेल्यानंतर त्या मोबदल्यात शासनाकडून अनूदान प्राप्त होईल ही भाबडी आशा घेऊन अनुदानाची प्रतीक्षा करीत असलेल्या शेतकर्‍यांचा अंत पाहत असल्याचे विदारक चित्र दिसत आहे . शेतकर्‍यांनी तज्ञांच्या सल्ल्यानेच पीक निवड करावी असे मत व्यक्त होत आहे.