होमपेज › Marathwada › मुलींचे लैंगिक शोषण करणार्‍या महाराजाची धुलाई

मुलींचे लैंगिक शोषण करणार्‍या महाराजाची धुलाई

Published On: Dec 28 2017 8:54PM | Last Updated: Dec 28 2017 11:19PM

बुकमार्क करा
बीड : प्रतिनिधी

केज तालुक्यातील लहुरी येथील लालगीर बाबांच्या गादीवर दोन वर्षांपूर्वी बसलेल्या वासुदेव शास्त्री महाराजाने मुलींना भागवत शिकविण्याच्या बहाण्याने वृंदावन येथे नेत त्यांचे लैंगिक शोषण करण्यास सुरुवात केली. हा प्रकार मुलीच्या नातेवाईकांना समजल्यावर त्यांनी महाराजाची येथेच्छ धुलाई करत पोलिसांच्या स्वाधीन केले 
आहे. 

तालुक्यातील लहुरी येथे लालगीर बाबाचा मठ आहे. या मठावर गेल्या दोन वर्षांपूर्वी लहुरी ग्रामस्थांनी गावात भागवत सांगण्यासाठी आलेल्या वासुदेव महाराज शास्त्री याची मठाधिपती म्हणून निवड केली. या मठाकडे अठरा एकर मालकीची जमीन आहे. 

वासुदेव महाराज शास्त्री यास मठाधिपती केल्यानंतर लहुरी ग्रामस्थांनी त्यास राहण्यासाठी आरसीसीच्या दोन रुमसह महागडी कार भेट म्हणून दिली. या महाराजाने मठाची सुत्रे ताब्यात घेतल्यापासून त्याची कारकीर्द वादग्रस्त राहिली आहे. यापूर्वीही त्यांने मुलींची छेडछाड केल्याच्या घटना घडल्या होत्या, मात्र आपल्या मुलीच्या इज्जतीचा पंचनामा नको म्हणून याबाबतीत तक्रारी झाल्या नाहीत. त्यामुळे वासुदेव महाराजाची हिम्मत वाढली. भागवत शिकविण्याचा बहाणा करत महाराजाने दोन मुलींना वृंदावन येथे नेले होते. तेथे नेल्यानंतर त्यांच्याशी लगट करत त्यांचे अश्‍लील फोटो काढून त्यांचे लैंगिक शोषण करण्यास सुरुवात केली. मुलीने  नकार देताच महाराज त्यांना मारहाण करत असल्याने महाराजाच्या या दुष्कृत्याला दोन मुली बळी पडल्या. 

दिवसेंदिवस महाराजाचा त्रास वाढत असल्याने याची माहिती मुलींनी त्यांच्या नातेवाईकांना दिली. मुलीच्या नातेवाईकांनी वासुदेव महाराज शास्त्री यास वृंदावन येथे गाठत मारहाण करून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. लहुरीतील वासुदेव महाराज शास्री हा परभणी जिल्ह्यातील साडेगाव येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येते. दरम्यान, या घटनेनंतर  लहुरी ग्रामस्थ वासुदेव शास्त्रीची माहिती देण्याबाबत मौन बाळगून आहेत.