Tue, Jun 25, 2019 22:02होमपेज › Marathwada › डाळिंबावर ‘तेल्या’चे संकट; दीड कोटीचे नुकसान

डाळिंबावर ‘तेल्या’चे संकट; दीड कोटीचे नुकसान

Published On: Jul 30 2018 1:30AM | Last Updated: Jul 29 2018 10:48PMआष्टी : सचिन रानडे 

गेल्या अठरा-वीस वर्षांपूर्वी तालुक्याला नव्हे तर संपूर्ण बीड जिल्ह्याला डाळिंब या पिकाची ओळख करून देणार्‍या शिरापूर (ता.आष्टी) या गावात यावर्षी डाळिंबावर तेल्या रोग पडल्याने बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. हातातोंडाशी आलेला घास या भयानक रोगाने हिरावून घेतला आहे. शिरापूर या गावांमध्ये एकूण सहाशे एकर वर डाळिंब  लागवड असून त्यापैकी अर्ध्या क्षेत्राचे नुकसान झाले आहे. आजच्या बाजारभावाप्रमाणे शिरापूर या एका गावात जवळपास दीड कोटी रुपयाचे  नुकसान झाले आहे.

तालुक्यातील शिरापूर या गावाची संपूर्ण जिल्हाभरात डाळिंबाचे गाव म्हणून ओळख आहे. दीड हजार लोकसंख्या असलेल्या या गावात प्रत्येक शेतकर्‍याकडे डाळिंबाची बाग आहे. सर्वप्रथम सन 2000 साली डाळिंब बागा लावल्या गेल्या. गावाजवळ मेहकरी धरण असल्याने  त्याचा शेतकर्‍यांना फ ायदा झाला. त्यानंतर शासनाच्या फळबाग धोरणाचा लाभ घेत शेकडो एकरवर बाग बहरल्या आहेत. मध्यंतरी दुष्काळी स्थितीत विकत पाणी घेऊन शेतकर्‍यांनी बागा जगविल्या. यावर्षी जानेवारी महिन्यात फळ धरण्यात आलेल्या बागा जुलै-ऑगस्टमध्ये तोडणीस येतात. सहाशे एकर पेक्षा जास्त डाळिंबाच्या बागा या सात-आठ महिने मोठा खर्च करून मोठ्या हिमतीने जगविल्या, मात्र फळ तोडणीच्या वेळी म्हणजे जुलै महिन्यात अचानक तेल्या रोगाने बागा उध्वस्त केल्या आहेत. 

सहाशे एकर पैकी जवळपास 300 एकरवर तेल्याचा प्रादुर्भाव झाला आहे. हा रोग भयंकर असल्याने व ठोस प्रतिबंधक उपाय नसल्याने विक्रीस आलेले फळ तोडून शेत बांधावर फेकून देण्याची वेळ आली आहे. तर काहींनी  फळे तोडून रस्त्यावर टाकली आहेत. डाळींबावर पडलेल्या या रोगामुळे दीड कोटीपेक्षाही जास्त नुकसान झाले.