Sun, Jul 21, 2019 05:33होमपेज › Marathwada › अल्पवयीन मुलगी पुढे, गुंड मागे...

अल्पवयीन मुलगी पुढे, गुंड मागे...

Published On: May 12 2018 3:43PM | Last Updated: May 12 2018 3:43PMबीड : प्रतिनिधी

धारदार शस्त्र घेऊन मागे लागलेल्या गुन्हेगारापासून स्वतःचा जीव वाचविण्यासाठी एक अल्पवयीन मुलगी  धावतपळत पोलिस अधीक्षक कार्यालयात आली. पोलिसांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला असता त्याने एका  पोलिस शिपायावर कत्तीने वार केला. फौजदार व काही कर्मचार्‍यांनाही त्याने ठार मारण्याची धमकी देत पळ  काढला. ही घटना शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास घडली. 

पोलिसांनी तपासाची सूत्रे फिरवीत अब्दुल रेहमान उर्फ एरार याला सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास ताब्यात घेतले. बलभीमनगरमधील 16 वर्षीय मुलगी मध्यवर्ती बसस्थानकात शुक्रवारी सकाळी 6 वाजण्याच्या  सुमारास पुण्याहून आई येणार असल्याने  तिला घेण्यासाठी आली होती. दरम्यान, तेथे एरार आला. त्याने तिची छेड काढणे सुरू केल्याने ती दुसरीकडे जाऊ लागली. तिचा पाठलाग करत एरारने धारदार कत्ती  काढली. हे पहाताच घाबरलेल्या त्या मुलीने  पळण्यास सुरुवात केली. पोलिस अधीक्षक कार्यालयात ती गेली असता तेथेही एरार कत्ती घेऊन दाखल झाला. गार्ड ड्युटीवर असलेल्यांनी  एरारला थांबविण्याचा प्रयत्न केला  असता एकावर एरारने वार केला. हा गोंधळ ऐकून कार्यालयातील इतर पोलीस धावतच तेथे आले. एखाद्याला तरी खल्लास करतोच अशी धमकी एरारने सर्वांना दिली. 

दरम्यान, सर्वांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता एरारच्या हातातील कत्ती त्यांच्या  हातात आली मात्र  त्याने फौजदार डिग्गीकर यांच्यावर फुटलेल्या कुंडीचे तुकडे फेकत पळ काढला. पळताना  त्याच्या हातात अन्य  एक हत्यारही होते.  चालाख आरोपी एरार हा सकाळी मद्य प्राशन केलेल्या अवस्थेत बसस्थानकात थांबला  होता. नशेतच त्याने हा प्रकार केल्याचे पोलिसांनी सांगितले. तो अत्यंत चालाख आरोपी आहे. कोणत्याही  ठिकाणी चोरी करायची अन् जमाव मागे लागला की थेट पोलिस ठाण्यात धावत पळत शरण यायचे, असे  एकाहून एक हातखंडे एरारकडे असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

पळून गेलेल्या एरारचा शोध पोलिसांनी तत्काळ सुरू केला. शहर ठाण्याचे पोलिस निरीक्षक सय्यद सुलेमान  यांनी त्यास पाथरुड गल्ली येथून सकाळी आकरा वाजण्याच्या सुमारास ताब्यात घेतले. त्याला शहर ठाण्यात  आणत त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. अब्दुल रेहमान उर्फ एरार हा चोर्‍या करणारा सराईत गुन्हेगार आहे. मोबाईल चोरी, दुकानाच्या गल्ल्यातील पैसे काढून नेणे असे प्रकार तो नेहमी करीत असल्याची माहिती पोलिस  निरीक्षक सय्यद सुलेमान यांनी दिली. त्याच्या विरुद्ध अनेक गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी ताब्यात  घेतल्यानंतर स्वतःला जखमी करून घेतल्याचे प्रकार त्याने यापूर्वी केले असल्याचेही ते म्हणाले.