Fri, Jul 19, 2019 20:46होमपेज › Marathwada › पोटगी न देणार्‍या मुलाविरुध्द गुन्हा दाखल

पोटगी न देणार्‍या मुलाविरुध्द गुन्हा दाखल

Published On: Jan 12 2018 11:46AM | Last Updated: Jan 12 2018 11:46AM

बुकमार्क करा
उस्मानाबाद : प्रतिनिधी

वृध्द मातापित्यांचा सांभाळ न करणार्‍या मुलाला पोटगी देण्याचा आदेश उपविभागीय अधिकार्‍यांनी दिला होता. तो न पाळल्याने अखेर या मुलाविरुध्द आनंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

दारफळ (ता. उस्मानाबाद) येथील लक्ष्मण जनार्दन देशपांडे (वय, 80) व त्यांची पत्नी प्रभावती यांचा मुलगा श्यामसुंदर याचा टाईपरायटिंगचा व्यवसाय आहे. शिवाय तो शेतीही करतो. मेडसिंगा येथे आईच्या नावे असलेली जमीन त्याने फसवून स्वत:च्या नावे केली. शेतात वीजेचे कनेक्शन घेण्याचे निमित्त करुन त्याने शंभर रुपयांच्या स्टँपवर वाटणीपत्र करुन आईला बेदखल केले. याबरोबरच वडिलांच्या नावे असलेला प्लॉट व दारफळ येथील राहते घरही स्वत:च्या नावे केले. पोटच्या मुलाने अशा पध्दतीने वार्‍यावर सोडल्यानंतर या मातापित्यांनी उपविभागीर अधिकार्‍यांकडे दाद मागितली. मातापिता संगोपन कायद्यानुसार यावर उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे यांच्यासमोर सुनावणी झाली. त्यांनी मातापित्यांचा चरितार्थ चालविण्यासाठी दरमहा दहा हजार रुपये पोटगी देण्याचा आदेश मुलगा श्यामसुंदर याला दिला. त्याने याविरुध्द जिल्हाधिकार्‍यांकडे आव्हान दिले. तिथे त्याचा अर्ज फेटाळला गेला, त्यानंतरही त्याने मातापित्यांना पोटगी दिली नाही. अखेर मातापित्यांनी पुन्हा  गिरासे यांच्याकडे धाव घेतल्यानंतर त्यांनी जिल्हादंडाधिकारी व उपविभागीय अधिकार्‍यांच्या आदेशाचा भंग केल्याने आनंदनगर पोलिस ठाण्यात श्यामसुंदर याच्याविरुध्द गुन्हा दाखल केला.