Mon, Apr 22, 2019 12:19होमपेज › Marathwada › 9 नगरसेवकांवर टांगती तलवार

9 नगरसेवकांवर टांगती तलवार

Published On: Aug 25 2018 1:15AM | Last Updated: Aug 24 2018 11:50PMपरभणी : प्रतिनिधी

जिल्ह्यात नोव्हेंबर 2016 मध्ये झालेल्या सार्वत्रिक नगर परिषद निवडणुकीत निवडून आलेल्या 15 नगरसेवकांनी जात वैधता प्रमाणपत्रासाठीचे प्रस्ताव जात पडताळणी समितीकडे सादर केले होते. त्यापैकी एका नगराध्यक्षाचे जात प्रमाणपत्र अवैध ठरले असून उर्वरित 8 तसेच मनपाच्या एका नगरसेवकांवर कारवाईची टांगती तलवार आहे. 
निवडून आल्यानंतर 6 महिन्यांत जात वैधता प्रमाणपत्र दाखल करण्यास त्यांना आदेशित केले होते. त्यांची प्रकरणे जात पडताळणी समितीकडे प्रलंबित आहेत. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने पुढील आदेशापर्यंत सदरील नगरसेवकांबाबतचा निर्णय स्थगित ठेवण्याचे निर्देश दिले होते, मात्र आता त्यांच्यावर कारवाई अटळ आहे. 

परभणी जिल्ह्यात गंगाखेड, सेलू, सोनपेठ, मानवत, जिंतूर, पाथरी, पूर्णा अशा एकूण 7 नगरपालिका आहेत. नोव्हेंबर 2016 मध्ये झालेल्या निवडणुकीत एकूण 147 नगरसेवक निवडून आले होते. त्यात खुल्या प्रवर्गातील 87  तर राखीव प्रवर्गातील 60 नगरसेवकांचा समावेश आहे. तसेच 7 पैकी 4 नगरपालिकांचे अध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी राखीव होते. उर्वरित तीन अध्यक्षपदे राखीव गटासाठी होती. त्यापैकी मानवतच्या नगराध्यक्ष शिवकन्या नंदकुमार स्वामी यांचे अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र अवैध ठरल्याने त्यांचे अध्यक्षपद गेले आहे. 

जात पडताळणी समितीकडे जात वैधता प्रमाणपत्रासाठी प्रस्ताव सादर केलेल्यांमध्ये आशा नरेंद्र दिशागत (सेलू-नागरिकांचा मागास प्रवर्ग-स्त्री, प्रभाग क्र. 3 अ), विठ्ठल उत्तमराव काळबांडे (सेलू-ना.मा.प्र.-7 अ), शीतल गणेश कुर्‍हाडे (मानवत- ना.मा.प्र. 3 अ), मीरा मोहन लाड (ना.मा.प्र-स्त्री, 6 अ), सारिका राजकुमार खरात (अ.जा-स्त्री, 1 अ), अमृत महालिंग स्वामी (सोनपेठ- अ.जा, 2 अ) यांचा समावेश होता. त्यांनी जात वैधता प्रमाणपत्र दाखल केले आहे. मात्र सेलू नगरपालिकेच्या सदस्या कादरी नाहीद तबस्सुम अजीम (अ.जमाती-स्त्री, 5 अ), विश्रांती सदाशिव जाधव (अ.जा.-स्त्री, 12 अ), सुवर्णा सुनील बरवे (सोनपेठ, ना.मा.प्र. स्त्री, 4 अ), आम्रपाली सतीश वाकडे (अ.जा. स्त्री, 2अ), शमा परवीन बेलदार (पाथरी, ना.मा.प्र. स्त्री, 7 अ), मंगल राजेश पाटील (ना.मा.प्र., 9 अ), अजिज खान पठाण (गंगाखेड, ना.मा.प्र., 9 अ) आणि विमलबाई रमेश घोबाळे (अ.जा. स्त्री, 10 अ) यांनी अद्याप जात वैधता प्रमाणपत्र दाखल केले नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील नगरपालिका प्रशासन विभागाचे अव्वल कारकून श्रीकांत करभाजन यांनी दिली आहे.