Thu, Jun 27, 2019 13:41होमपेज › Marathwada › संततधार पावसाने ऊस भुईसपाट; कापूस उन्मळला

संततधार पावसाने ऊस भुईसपाट; कापूस उन्मळला

Published On: Aug 24 2018 12:45AM | Last Updated: Aug 23 2018 8:47PMपाथरी : प्रतिनिधी

गेल्या चार दिवसांपासून सतत जोरदार पडलेल्या पावसाने व वार्‍यामुळे चांगल्याप्रकारे वाढ झालेला ऊस भुईसपाट झाला आहे.तर महिनाभर पाऊस नसल्याने सुकू लागलेल्या सखल भागातील कापूस आणि तुरही चार दिवसांपासून सततच्या पावसाने शेतात पाणी साचल्याने उन्मळू लागले. यामुळे शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे.

परिसरात वेळेवर पाऊस न पडल्याने मुगाचे पीक शेतकर्‍यांच्या हातातून गेले आहे. सोयाबीनच्या उत्पादनातही मोठी घट होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.पावसाच्या लहरीपणामुळे पाथरी तालुक्यातील खरिपाच्या पिकांना मोठा फटका बसला आहे. तालुक्यातील नाथरा, पाथरगव्हाण, कासापुरी, बानेगाव, निवळी, पाटोदा, वडी, हादगाव, मंजरथ, रामपुरी, ढालेगाव, लिंबा, विटा, मुदगल, वाघाळा, फुलारवाडी, गोपेगाव, मरडसगाव, झरी, रेणापूर, बाभळगाव, सारोळा, पोहेटाकळी, देवनांद्रा यांच्यासह बहुतेक गावांत उसाची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. तसेच कापूस, तूर, सोयाबीन ही पिके सतत जोरदार पडलेल्या पावसाने धोक्यात आली असून वेळेवर पाऊस न पडल्याने मुगाचे पीक शेतकर्‍यांच्या हातातून गेले आहे. तर महिनाभर पावसाने दडी मारल्याने कापूस, तूर, सोयाबीन या पिकांची वाढ खुंटली होती. पण 19 ऑगस्ट रोजी सुरू झालेल्या दमदार पावसाने चार दिवसांत सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. दररोज येणार्‍या पावसाने सखल भागात पाणी साचल्यामुळे कापूस, तूर ही पिके उन्मळली आहेत.