Sun, Mar 24, 2019 06:13होमपेज › Marathwada › पावसामुळे अकरा गावांचा संपर्क तुटला

पावसामुळे अकरा गावांचा संपर्क तुटला

Published On: Jun 24 2018 1:33AM | Last Updated: Jun 23 2018 10:21PMपालम : प्रतिनिधी

तालुक्यात शुक्रवारी (दि.22)  रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे  शहरापासून जवळच असलेल्या लेंडी नदीला पूर आला. यामुळे पात्रापलीकडील अकरा  गावांचा शनिवारी (दि.23)  सकाळी 7 वाजेपासून दुपारी वाजेपर्यंंत संपर्क तुटला होता. विशेष म्हणजे या महिन्यात दुसर्‍यांदा या भागाचा संपर्क तुटला  आहे.

शहरापासून जांभूळबेट रस्त्यावर अर्ध्या कि.मी. अंतरावर लेंडी नदीच्या पात्रात केवळ 3 फूट उंचीचा जुना पूल आहे. पाऊस पडताच हा रस्ता वाहतुकीसाठी बंद होण्याचे प्रकार वारंवार घडतात. शनिवारी सकाळी 7 वाजेच्या सुमारास पुराचे पाणी वाढत गेल्याने या पुलावर 6 फूट पाणी वाहत होते. यामुळे नदी पात्रापलीकडील फळा, आरखेड, सोमेश्‍वर, घोडा, उमरथडी तर दुसर्‍या बाजूला पुयणी, आडनाव, वनभुजवाडी, नाव्हा, नाव्हलगाव, गणेशवाडी   या गावांचा संपर्क  तुटला. 

या गावाला जाणारे मार्ग बंद होते. दुपारी 1 वाजेच्या सुमारास पुलावरील पाणी ओसरण्यास सुरुवात झाली. सकाळी 7 ते दुपारी 1 दरम्यान अकरा गावांतील ग्रामस्थांना अडकून पडावे लागले. या पावसामुळे शेतकरी सुखावला असून, अनेक भागांत प्रत्यक्ष पेरण्यांना सुरुवात केली आहे. आठ दिवसांपासून जिल्ह्यातील पेरण्या खोळंबल्या होत्या. या पावसामुळे शेतकरी पेरता झाला आहे. या पावसामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.