Sun, Jan 20, 2019 18:27होमपेज › Marathwada › चार न्यायाधीशांविरोधात हुंड्यासाठी छळाची तक्रार

चार न्यायाधीशांविरोधात हुंड्यासाठी छळाची तक्रार

Published On: Jun 23 2018 7:56AM | Last Updated: Jun 23 2018 7:56AMनांदेड : प्रतिनिधी

हुंड्यासाठी छळ केल्याच्या कारणावरून चार न्यायाधीश, दोन वकील व दोन महिला अशा आठ जणांविरुद्ध इतवारा पोलिस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला. यासंबंधीची तक्रार पीडित महिलेने दिली आहे. विशेष म्हणजे तिचे वडील सेवानिवृत्त न्यायाधीश आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी शेख वासीम अक्रम शेख जलाल यांचे लग्‍न 2016 मध्ये नांदेड येथे राहणार्‍या गुलअफशार यांच्यासोबत झाले. मात्र, लग्‍नाच्या काही दिवसांनंतर दोघांत तणाव वाढत गेला. यावरून पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलिस अधिकार्‍यांनी दोघांमधील भांडण मिटण्यासाठी बराच प्रयत्न केला, परंतु यश आले नाही.
विवाहितेने गुरुवारी इतवारा पोलिस ठाणे गाठत, सासरच्या मंडळींकडून चार लाख रुपये व इतर साहित्य मिळून अकरा लाख पन्नास हजार रुपयांची मागणीसाठी छळ केला जात असल्याचे तक्रारीत नमूद
केले. यावरून इतवारा पोलिसांनी न्यायाधीश शेख वासीम अक्रम, त्यांचे भाऊ न्यायाधीश शेख अमिर शेख जलाल, न्यायाधीश असलेले भाऊजी जावेद सिद्दीकी व नुकतेच न्यायाधीश पदाची परीक्षा पास झालेले शेख जुनेद शेख जलाल तसेच वकील शेख वासीम, त्यांचे वडील मोहमद जलाल शेख काझी, त्यांची आई अफसरी बेगम शेख जलाल व नणंद शेख फरानाज शेख जावेद सिद्दीकी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.