Thu, Jul 18, 2019 08:44होमपेज › Marathwada › सहकार क्षेत्राला बळकट करणार : सहकारमंत्री सुभाष देशमुख 

सहकार क्षेत्राला बळकट करणार : सहकारमंत्री सुभाष देशमुख 

Published On: Dec 07 2017 7:17PM | Last Updated: Dec 07 2017 7:17PM

बुकमार्क करा

कळवण: प्रतिनिधी 

छोट्या छोट्या कारणांमुळे बंद असलेले उद्योग व्यवसाय अडचणी दूर करून सुरु करण्यासाठी सहकार क्षेत्राला बळकट करण्याचे धोरण राबविण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन सहकारमंत्री नामदार सुभाष देशमुख यांनी केले. 

सहकार क्षेत्रात योगदानातून कार्यकर्त्याची चळवळ व्यापक होण्याची गरज आहे. निर्यात सुविधा केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठा लाभ होणार आहे. येत्या काळात शेतकऱ्यांची गरज ओळखून नाशिकमध्ये टर्मिनल मार्केटची उभारणी सरकारच्या विचाराधीन आहे, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ पुणे यांच्या शेतमाल निर्यात  सुविधा केंद्राच्या उद्‌घाटनप्रसंगी सहकार मंत्री देशमुख  बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार डॉ. राहुल आहेर, आमदार जे. पी. गावित, आमदार प्रवीण दरेकर, पणनचे कार्यकारी संचालक सुनील पवार, केदा आहेर आदींसह मान्यवर उपस्थित होते. 

यावेळी देशमुख यांनी नाशिक जिल्हा कांद्याचे आगर आहे. जेव्हा कांद्याला चांगला भाव मिळतो तेव्हा जे कांदा खात नाही तेच भाव वाढीमुळे ओरड करींत असल्याचे आश्चर्य वाटते. शेतकऱ्यांना दोन पैसे जास्त मिळत असतील तर कोणीही आड येऊ नये असे सहकार मंत्री यांनी सांगताच उपस्थितांमधून टाळ्यांचा कडकडाट झाला, तसेच बंद असलेले उद्योग व्यवसाय अडचणी दूर करून सुरु करण्यासाठी शासन प्रयत्न करत असून त्याचाच एक भाग म्हणून गेल्या ५ वर्षांपासून बंद असलेले निर्यात सुविधा केंद्र सुरु झाले आहे.

या भागातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी या निर्यात सुविधा केंद्राचा लाभ घ्यावा. याच माध्यमातून शेतकऱ्यांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध होणार असून शेतकऱ्यांना आर्थिक सक्षम होण्याची संधी आहे असे आवाहनही त्यांनी केले. येणाऱ्या काळात सहकारी संस्था चालविणाऱ्यांनी शासनाच्या अनुदानाची वाट न बघता सहयोगातून पैसे उभा करून संस्था मोठी करण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच येणाऱ्या काळात बाजार समित्यांमधील काही ठराविक लोकांची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याला बाजार समितीसाठी मतदान करण्याचा कायदा केल्याचे सांगून आता खरा शेतकरी बाजार समितीचा राज्यकर्ता होणार असल्याचे नामदारांनी सांगितले.

यावेळी आमदार प्रवीण दरेकर यांनी सहकार क्षेत्राला मदत करण्यासाठी शासन तयार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्तविक पणनचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांनी केले. यावेळी शेतकी संघाचे चेअरमन सुधाकर पगार, निंबा पगार, जितेंद्र पगार, रवींद्र देवरे, धनंजय पवार, अँड. संजय पवार आदींसह कळवण देवळा तालुक्यातील सर्व सोसायट्यांचे संचालक, सर्व ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच, मान्यवर व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

पुढे बोलतांना श्री देशमुख म्हणाले की, राज्यातील २२ हजारे संस्थांमधील किमान ५ हजार संस्थांना व्यवसायासाठी सरकारने सहकार्य केले असून नाशिक जिल्ह्यातील ८५ संस्थांच्या योगदानातून विविध व्यवसाय जिल्ह्यात सुरु करण्यात आले आहेत. 

यावेळी नाशिक जिल्ह्यातील बाजार समितीचे संचालक मंडळ, शेतकरी सहकारी संघ कळवण व विविध बँकेच्या पदाधिकारी यांनी मान्यवरांचा सत्कार केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी संचालक सुनील पवार यांनी केले. सूत्रसंचालन जागृती कौलगीकर यांनी केले.