होमपेज › Marathwada › हिंगोली : पाच हजाराची लाच स्विकारताना लिपीकास अटक

हिंगोली : पाच हजाराची लाच स्विकारताना लिपीकास अटक

Published On: Jul 26 2018 1:34AM | Last Updated: Jul 25 2018 8:59PMहिंगोली : प्रतिनिधी

विहिरीच्या झालेल्या कामाचे मोजमाप पुस्तिका व काम पुर्ण झाल्याचा दाखल्यावर उपविभागीय अभियंत्याची सही  घेण्यासाठी औंढ्यातील लोकसेवक कनिष्ठ अभियंता दिलीप कांबळे यांनी तक्रारदाराकडे पाच हजार लाचेची मागणी केली होती. कांबळे यांनी ही रक्‍कम कनिष्ठ लिपीक विशाल गणेश मस्के यांच्याकडे देण्यास सांगितली. विशाल गणेश मस्के याने पाच हजार रूपयाची ही लाच स्विकारतांना आज, बुधवारी औंढा येथील ग्रामीण पाणी पुरवठा उपविभागाच्या कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधात्मक पथकाने मस्के यास रंगेहाथ अटक केली.

याबाबत अधिक माहिती अशी की, रोहयो अंतर्गत अहिल्याबाई होळकर विहिर तक्रारदाराची आई व चुलती यांच्या नावावर मंजुर करण्यात आली होती. त्यानुसार दोन्ही विहिरीचे झालेल्या कुशल कामची मोजमाप पुस्तिका व काम पुर्ण झाल्याचा दाखल्यावर उपविभागीय अभियंता यांची सही घेण्यासाठी कनिष्ठ अभियंता दिलीप कांबळे यांनी पाच हजार रूपयाची मागणी केली होती. तक्रारादाराने यासंबंधी हिंगोली येथील एसीबी कार्यालयाकडे तक्रार दिली होती. त्यानुसार एसीबीच्या पथकाने सापळा रचला. 

तक्रारादार सदरची ही रक्कम कांबळे यांना देण्यासाठी गेले असता कांबळे यांनी ही रक्कम कनिष्ठ लिपीक विशाल मस्के यांच्याकडे देण्यास सांगितले. औंढा येथील ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग येथे विशाल मस्के यांनी ही रक्कम स्विकारताच एसीबीच्या पथकाने त्यास रंगेहाथ पकडले. ही कारवाई पोलिस अधीक्षक संजय लाटकर, पोलिस उपधीक्षक रविंद्र थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक नितीन देशमुख, जितेंद्र पाटील यांच्यासह अन्य पोलिस पथकाने केली.