Sat, May 25, 2019 22:55होमपेज › Marathwada › चिखलीच्या आलमचा मंत्रालयात ‘जम’

चिखलीच्या आलमचा मंत्रालयात ‘जम’

Published On: Feb 25 2018 1:14AM | Last Updated: Feb 24 2018 11:55PMपाटोदा : महेश बेदरे 

सध्या सर्वत्र बेरोजगारी वाढल्यामुळे तरुणांना रोजगार व नोकर्‍या मिळत नसल्याच्या सर्वत्र चर्चा सुरू असतात, परंतु अशा प्रतिकूल परिस्थितीत यश खेचून आणणाराच खरा जेता ठरत असतो. अगदी अशाच प्रकारे पाटोदा तालुक्यातील चिखली या छोट्याशा गावातील आलम बशीर शेख या अवघ्या बावीस वर्षांच्या तरुणाने थेट मुंबई गाठून अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असतानाही अतिशय धाडसाने व चतुराईने मंत्रालयासमोरे खादी कपडे विक्रीचा ( नेते वापरतात ते ) व्यवसाय सुरू केला व अवघ्या एक वर्षात आपला जम बसवून दाखवला.

पाटोदा तालुक्यातील चिखली या गावातील आलम बशीर शेख या तरुणाची घरची परिस्थिती अत्यंत बिकट होती. प्रत्येक वर्षी वडील ऊसतोड मजुर म्हणुन कारखान्यावर जात, आपल्या वडिलांचे कष्ट बघून आलमला आपणही काहीतरी करावे असे वाटायचे, त्याला राजकीय नेत्यांचेही पहिल्यापासूनच आकर्षण वाटायचे, अखेर त्याने एक दीड वर्षापूर्वी मुंबई गाठली, बीड जिल्हातील एखाद्या मोठ्या नेत्याकडे काहीतरी काम करायचे अशी आलम ची इच्छा होती, त्यासाठी त्याने मंत्रालयाचे खेटे मारायला सुरुवात केली.  

दरम्यान काही दिवसांतच त्याच्या डोक्यात या नेत्यांचे कपडे पाहून आपण जर याच परिसरात असा छोटासा व्यवसाय सुरू केला तर? असा विचार चमकून गेला व त्याने तत्काळ अतिशय धाडसाने निर्णय घेऊन हा व्यवसाय सुरू केला, या साठी त्याच्या वडिलांनी अक्षरशः व्याजाचे पैसे घेऊन त्याला दिले व मुंबईत वास्तव्यास असलेला गावकाडचा मित्र लक्ष्मण लाड याने आलमला कपडे विक्रीसाठी आपली जुनी कार देऊन मदत केली.

नेत्यांची ओळख 
आलमने थेट पंजाब, अमृतसरहून खादीचे रेडीमेड व कपडा विक्रीसाठी आणले. उत्तम दर्जाचे कपडे व लाघवी संभाषण चातुर्याने अल्पावधीतच आलमने अनेक नेत्यांशी ओळखी केल्या. आलमकडे जवळपास दीडशे आमदारांनी खादीचे कपडे विकत घेतले आहेत.  

यामध्ये शिक्षण मंत्री विनोद तावडे, विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, माणिकराव ठाकरे, एकनाथ खडसे, यांच्यासह माजी राज्यमंत्री सुरेश धस व आ. भीमराव धोंडे आदींसह अनेक बड्या नेत्यांचा समावेश असून आता आलमकडे 2 हजारांपासून 20 हजारापर्यंतचे ड्रेस विक्रीसाठी आहेत.

विनोद तावडेंचे विशेष सहकार्य 
आपल्याला या ठिकाणी व्यवसाय सुरू केल्यानंतर अनेक अडचणी येत होत्या. एके दिवशी येथून शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी स्वतः एक शर्ट खरेदी केला व आपुलकीने चौकशी केली. त्यानंतर प्रत्येक अडचणीच्या वेळी तावडे यांनी सहकार्य केले व आता तर आमदार निवास परिसरात दुकानासाठी किरायाने जागेसाठी ही ते प्रयत्न करणार असल्याचे आलमने सांगितले.