होमपेज › Marathwada › एसटीच्या संपाला अत्यल्प प्रतिसाद  

एसटीच्या संपाला अत्यल्प प्रतिसाद  

Published On: Jun 09 2018 1:35AM | Last Updated: Jun 09 2018 12:05AMपरभणी : प्रतिनिधी

एसटी कर्मचार्‍यांनी वेतन वाढीसह विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात 8 जून रोजी पुकारलेल्या अघोषित बंदला परभणी आगारातील कर्मचार्‍यांनी अत्यल्प प्रतिसाद दिला. एसटी कामगार संघटना व छाजेड प्रणित आयटक कर्मचारी संघटनेने संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतला; परंतु यामुळे फारसा परिणाम झाला नाही.  

एसटी कर्मचार्‍यांच्या मूळ वेतनात दिलेली वेतन वाढ ही तुटपुंजी आहे. शासनाने कर्मचार्‍यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून न्यायासाठी शासन दरबारी मागणी असलेल्या कर्मचार्‍यांना अपेक्षित वेतनवाढ मिळावी. विविध प्रलंबित प्रश्‍न त्वरित मार्गी लावावेत, याकरीता एसटी कामगार संघटना व आयटक संघटनेने कर्मचार्‍यांना अघोषित संपाचे आवाहन केले होते. 7 जूनच्या रात्री 12 वाजता संघटनांनी संप पुकारला होता. यात मोजक्याच कर्मचार्‍यांनी सहभाग नोंदवला. यामुळे अहमदपूर, मुदगल, जोडपरळी, सिंगणापूर, लातूर जाणार्‍या 2, बीडला जाणार्‍या 2 अशा 8 बस परभणीत आगारातून जाऊ शकल्या नाहीत. परभणी आगारात 150 वाहक, 150 चालक यांच्यासह प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत; परंतु या आंदोलनात संपकर्त्या दोन्ही संघटनांतील प्रत्येकी दहा ते पंधराच कर्मचारी संपावर गेले असल्याची माहिती परभणी आगाराचे वाहतूक निरीक्षक टी. आय. राठोड यांनी दिली आहे.