Tue, Nov 20, 2018 21:43होमपेज › Marathwada › सुट्यांमुळे बसस्थानकावर प्रवाशांची गर्दी

सुट्यांमुळे बसस्थानकावर प्रवाशांची गर्दी

Published On: Apr 30 2018 1:44AM | Last Updated: Apr 30 2018 12:00AMपरभणी : प्रतिनिधी

शालेय विद्यार्थ्यांना उन्हाळयाच्या सुट्या लागल्या आहेत. यामुळे बाहेरगावी जाणार्‍या प्रवाशांची संख्याही बसस्थानकांवर वाढत असल्याने परभणी विभागाने जादा 18 बसेस वाढवल्या आहेत. तसेच शासकीय कर्मचार्‍यांनाही सलग सुटी मिळाल्याने प्रवाशांची गर्दी मोठ्या प्रमाणात  वाढली आहे. त्यामुळे नेहमीपेक्षा जास्त प्रवाशी संख्या दिसत असल्याने वाढीव जादा बसेसही प्रवाशांची वाहतूक करण्यासाठी कमी पडत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. 

 परभणी बसस्थानकावर नेहमीच प्रवाशांची वर्दळ असते. येथे महाविद्यालये, जिल्हा स्तरावरील शासकीय कार्यालये, विविध शाळा असल्याने प्रवाशांची संख्या बसस्थानकावर नेहमीच जास्त असते. एप्रिल महिन्यात मात्र सकाळपासूनच प्रवाशांची जत्रा बसस्थानकावर भरत असल्याचे दिसतेे. त्यातच 28 एप्रिलपासून सलग चार दिवस शासकीय कार्यालयांना सुट्या आल्या आहेत. यात 28 एप्रिल रोजी चौथा शनिवार, 29 रोजी रविवार, 30 रोजी बुध्द पौर्णिमा, 1 मे रोजी महाराष्ट्र दिन अशा सुट्या सलग आल्या आहेत. ही बाब लक्षात घेत परभणी विभाग नियंत्रक जालिंदर सिरसाट यांनी विभागासाठी तब्बल 18 जादा बसेसची व्यवस्था केली आहे.