Tue, Jan 22, 2019 08:35होमपेज › Marathwada › बंधार्‍याची भिंत पूर्ण होण्यापूर्वीच कोसळली

बंधार्‍याची भिंत पूर्ण होण्यापूर्वीच कोसळली

Published On: May 23 2018 1:12AM | Last Updated: May 22 2018 10:51PMपाथरी : प्रतिनिधी

जलयुक्‍त शिवार योजनेंतर्गत पाथरी तालुक्यातील बोरगव्हाण येथे चार सिमेंट बंधार्‍याची कामे केली जात असून, काम पूर्ण होण्याअगोदरच एका बंधार्‍याची भिंत कोसळल्याने जलयुक्त शिवार योजनेच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. निकृष्ट  कामामुळे हा प्रकार घडला आहे. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वीच येथील बंधार्‍याच्या दुसर्‍या कामाला जिल्हाधिकारी पी.शिवशंकर यांनी भेट दिली होती. 

जिल्हा परिषद लघुसिंचन उपविभाग जिंतूर अंतर्गत पाथरी तालुक्यातील बोरगव्हाण येथे 2016 - 17 या वर्षात चार सिमेंट बंधारे मंजूर झाले होते. चार बंधार्‍यांवर खर्चासाठी साधारणतः 52 लाख रुपये निधीची तरतूद करण्यात आली होती.  येथील चारपैकी दोन बंधार्‍यांचे काम पूर्ण झाले आहे. एका बंधार्‍याचे अंदाजपत्रक साधारणतः 13 लाख रुपयांपेक्षा अधिक आहे. 26 लाख रुपये खर्च करून उर्वरित दोन बंधार्‍याचे काम केले जात आहे. बंधार्‍याचे काम अद्याप पूर्ण झाले नाही, असे असताना बोरगव्हाण गावच्या वरच्या बाजूने सुरू असलेल्या एका बंधार्‍याची भिंत 22 मे रोजी अचानक कोसळली.  तुटून पडलेल्या भिंतीत दगडाचा थर दिसत असल्याने हे काम किती निकृष्ट  होत आहे हे दिसून येत आहे. पावसाळ्यापूर्वी कामे उरकून घेण्याचा हा प्रकार दिसून येत आहे. 

या कामाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी बोरगव्हाण येथील सरपंच मुंजा धोत्रे, उपसरपंच विठ्ठल कदम, ग्रामपंचायत सदस्य केशव खुडे, दिनकर कदम, दिनकर इंगळे, माणिक इंगळे यांनी केली आहे.